अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : विश्वास, परंपरा आणि जनजागृती या त्रिसूत्रीच्या जोरावर अकोला जिल्ह्यातील वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘अकोला दिव्य’ हे डिजिटल न्यूज पोर्टल आणि साप्ताहिक आज, ९ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या यशस्वी प्रवासाची ६ वर्षे पूर्ण करून ७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या अभिमानास्पद आणि आनंदाच्या क्षणी आम्ही आमचे सर्व सन्माननीय वाचक, हितचिंतक, जाहिरातदार आणि स्नेही यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तुमच्या अखंड पाठिंब्याशिवाय हा टप्पा गाठणे अशक्य होते.

या प्रवासाचा पाया आजपासून ३८ वर्षांपूर्वी, स्वातंत्र्यपूर्व काळाचा दैदिप्यमान वारसा लाभलेल्या, पत्रकारिता क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व स्व. ब्रजलालजी बियाणी यांनी ९ जुलै १९३१ रोजी सुरू केलेले मातृभूमी या दैनिकात आणि तत्कालीन संपादक आदरणीय स्व.कमलकिशोरजी बियाणी यांच्या सहवासातून १९८९ पासून मातृभूमीतील प्रदीर्घ अनुभवावर रचला गेला आहे. ‘दैनिक मातृभूमी’ मध्ये तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत विविध जबाबदाऱ्या अत्यंत निष्ठेने सांभाळल्या.बातम्यांमधील अचूकता, भाषेवरील प्रभूत्व आणि सामाजिक भान या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली. अखेर ३१ मे २०२० रोजी ‘निवासी संपादक’ या सर्वोच्च पदावरून निवृत्ती घेतली. परंतु, पत्रकारितेचे व्रत ज्यांच्या रक्तात भिनले आहे, ते शांत कसे बसणार ?
बदलत्या काळाची पावले आणि ‘अकोला दिव्य’चा उदय : निवृत्तीनंतर शांत न बसता, निवृत्तीनंतर अवघ्या काही महिन्यांतच, म्हणजेच ९ सप्टेंबर २०२० रोजी ‘अकोला दिव्य’ या नावाने साप्ताहिक सुरू केले. वाचकांचा वाढता प्रतिसाद आणि बदलत्या तंत्रज्ञानाची पावले ओळखून, आजची युवा पिढी डिजिटल माध्यमांकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहे, हे हेरून नवीन पिढीशी नातं जोडण्याचा निर्णय घेतला. डिजिटल युगाची गरज लक्षात घेऊन नंतर ‘अकोला दिव्य’ नावाने ऑनलाईन न्यूज वेबसाईट देखील सुरू केली.
६ हजार वाचकांचा विश्वास : एक सेवाव्रती उपक्रम. : दैनिक मातृभूमी मुळे स्वातंत्र्यपूर्व काळातली पत्रकारितेची मूल्ये, नैतिकता आणि आदर्श यांनी प्रेरित होऊन, स्व.कमलकिशोरजी बियाणी यांचे तत्वज्ञान व विचारधारा सहजपणे काही प्रमाणात अंगीकारली गेल्याने आजच्या डिजिटल युगातही ती मूल्ये जिवंत ठेवले आहेत. केवळ बातम्या देणे एवढाच उद्देश नसून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे आणि जनजागृती करणे हाच ‘अकोला दिव्य’चा मुख्य गाभा आहे.आताचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असून आजच्या ‘इन्स्टंट’ आणि व्यावसायिक जगात पत्रकारितेकडे एक व्यवसाय म्हणून न पाहता ‘सेवाव्रत’ म्हणून पाहिले आहे. सध्या ६,००० पेक्षा जास्त वाचकांना व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टच्या माध्यमातून दररोज विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या पोहोचवून ‘अकोला दिव्य’ने घरोघरी आपली ओळख निर्माण केली आहे.
सोशल मीडियाच्या युगात जिथे खोट्या बातम्यांचे पेव फुटले आहे, तिथे अचूक, निष्पक्ष आणि लोकहितैषी पत्रकारिता करणे हेच आमचे मुख्य ध्येय राहिले आहे. तीन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आणि लोकांचा अतुलनीय विश्वास असल्याने दिलेल्या बातमीवर वाचक डोळे झाकून विश्वास ठेवतात.आज ‘अकोला दिव्य’ केवळ एक बातमीचे माध्यम राहिलेले नाही, तर तो अकोलेकरांच्या विश्वासाचा एक भाग बनला आहे. हा ६ वर्षांचा प्रवास केवळ आमचा एकट्याचा नाही. यामध्ये आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे वाचक, ज्यांनी प्रत्येक बातमीवर विश्वास ठेवला; आमचे हितचिंतक, ज्यांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले; आणि आमचे व्यावसायिक भागीदार म्हणजेच जाहिरातदार, ज्यांनी आर्थिक बळ देऊन आमच्या या सेवाव्रताला गती दिली, या सर्वांचा यात सिंहाचा वाटा आहे.

‘विश्वास, परंपरा आणि जनजागृती’ या त्रिसूत्रीच्या जोरावर एका सेवेच्या भावनेतून ९ सप्टेंबर २०२० रोजी सुरू झालेला हा प्रवास आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झाला आहे. तुमच्या या सहकार्यामुळेच ‘अकोला दिव्य’ आज ९ सप्टेंबर २०२६ रोजी सातव्या वर्षात अधिक आत्मविश्वासाने पाऊल टाकत आहे. ‘अकोला दिव्य’ भविष्यातही यशाची नवनवीन शिखरे सर करेल यात शंका नाही. येत्या काळातही नव्या तंत्रज्ञानाची कास धरून, पत्रकारितेची मूल्ये जपत, अकोला आणि परिसरातील जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत मांडत राहू, हाच आमचा आजच्या वर्धापन दिनाचा संकल्प आहे. पुन्हा एकदा सर्व वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांना वर्धापनदिनानिमित्त कृतज्ञतापूर्वक धन्यवाद ! आपले प्रेम आणि विश्वास असाच कायम राहो, हीच सदिच्छा !
गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ
