अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोला महानगरपालिका स्थापनेला १ ऑक्टोबर २०२६ रोजी २५ वर्षे पूर्ण होत असून रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महानगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, व्यापारी, उद्योजक, युवक, महिला आणि नागरिक यांनी एकत्र येऊन “माझे शहर – माझी जबाबदारी” या भावनेतून हा उत्सव लोकचळवळीत रूपांतरित करावा. शहराच्या समृद्ध इतिहासाचे जतन आणि पुढील २५ वर्षांच्या विकासाचा लोकसहभागातून संकल्प म्हणून साजरा करण्यात यावा, अशी विकासाभिमुख संकल्पना गटनेता तथा नगरसेवक निलेश रामकृष्ण देव यांनी मांडली आहे.

यासंदर्भात महापौर शारदा रणजीत खेडकर यांना विशेष प्रस्ताव सादर करून वर्षभर विविध नाविन्यपूर्ण, सामाजिक, पर्यावरणपूरक, ऐतिहासिक व लोकसहभागावर आधारित उपक्रम आयोजित करण्याची मागणी केली आहे.महापालिका रौप्यमहोत्सवी वर्षासाठी २५ वर्षे लोकसेवेची – पुढील २५ वर्षे विकसित अकोल्याची ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून शहरातील प्रत्येक घटकाला या उत्सवाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात यावा, अशी भूमिका निलेश देव यांनी मांडली आहे.

यासाठी हा विशेष उपक्रम राबवून शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी, डिजिटल सेवा, वाहतूक व्यवस्था, जलव्यवस्थापन आणि शहर सुशोभीकरण अशा विविध क्षेत्रांसाठी २५ महत्त्वपूर्ण विकाससंकल्प निश्चित करण्याची सूचना करण्यात आली आहे.अकोल्याला अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्यासाठी “२५ वर्षे – २५ हजार वृक्ष” हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. वृक्षलागवडीसोबतच त्यांच्या संगोपनावर भर देत प्रत्येक वृक्षाची जबाबदारी नागरिक, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि विविध आस्थापनांना देण्यात यावी. त्यामुळे वृक्षलागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता “माझे झाड – माझी जबाबदारी” या भावनेतून दीर्घकालीन लोकचळवळ उभी राहू शकते.

अकोला व्हिजन २०४० : उद्याचा अकोला कसा असावा, याचा विचारही रौप्यमहोत्सवी वर्षात व्हावा, यासाठी “माझ्या स्वप्नातील अकोला–अकोला व्हिजन २०४०” हा अभिनव उपक्रम राबविण्यात यावा. विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, अभियंते, वास्तुविशारद, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांकडून भविष्यातील कल्पना व सूचना मागवून “अकोला व्हिजन २०४०” तयार करण्यात यावे.
अकोला महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शहराने केलेला विकासप्रवास पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यासाठी “माझ्या आठवणीतील अकोला” हे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात यावे. यामध्ये शहरातील जुनी छायाचित्रे, महत्त्वाची विकासकामे, बदललेले शहररूप, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी तसेच महानगरपालिकेच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे यांचे दस्तऐवजीकरण करण्यात यावे. यामुळे अकोल्याच्या भूतकाळाची ओळख नव्या पिढीला होईल आणि “आपले शहर कसे बदलले?” याचा प्रेरणादायी प्रवास नागरिकांसमोर उभा राहील.

रौप्यमहोत्सवी वर्षातील विशेष आणि भावनिक उपक्रम म्हणून “स्पंदने स्वातंत्र्याची” या नावाने अकोला जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानींच्या छायाचित्रांचे, जीवनकार्याचे आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सेनानींनी त्याग, संघर्ष आणि बलिदान केले. त्यांच्या कार्याची माहिती आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.विशेषतः अकोला जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची ओळख विद्यार्थी आणि युवकांना व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढील २५ वर्षांसाठी “अकोला विकास संकल्पपत्र” जाहीर करण्यात यावे, अशी अपेक्षा निलेश देव यांनी व्यक्त केली आहे.

