अकोला दिव्य : गजानन सोमाणी: एडिटर इन चीफ: अखंड सौभाग्य आणि वैवाहिक आनंदाचा सण म्हणजे राजस्थानी समाजातील सर्वांत महत्त्वाचा ‘सत्तू तीज’ ! माता पार्वतीच्या भगवान शिवाप्रती असलेल्या कठोर तपस्येचे आणि भक्तीचे प्रतीक आहे. हे व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभते आणि वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.राजस्थानमधील बुंदी (Bundi) शहरात कजरी किंवा सत्तू तीजच्या निमित्ताने एक भव्य पारंपारिक जत्रा (मेळा) भरवली जाते, जिथे तीज मातेची मोठी मिरवणूक काढली जाते.
सत्तू तीज हा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील तृतीया तिथीला (ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये) साजरा केला जातो.या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी, तर अविवाहित मुली चांगला वर मिळण्यासाठी दिवसभर ‘निर्जला व्रत’ करतात. हा सण पावसाळ्याच्या उत्सवाशी जोडलेला आहे. निसर्गातील हिरवळ, ढग आणि पावसाचे स्वागत करण्यासाठी महिला हा आनंदोत्सव साजरा करता. सर्वांनी अनुभवलेल्या आणि आनंद घेतलेल्या रंगीबेरंगी सणांपैकी एक म्हणजे तीज उत्सव. हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. महिला सकाळी लवकर उठून स्नान करतात. नवीन पारंपरिक वस्त्रे परिधान करून सोळा शृंगार करतात रंगांची उधळण, प्रचंड जल्लोष व मनोरंजक विधींनी नेहमीच मोहित केले.

पिवळ्यापासून नारंगी, गडद लाल व भडक गुलाबी, हिरव्या रंगांपर्यंतच्या सुंदर पोशाखात सजलेल्या महिला….. त्यांच्या हातांवर आणि पायांवर काढलेली नाजूक नक्षीदार मेहंदी… हातात घातलेल्या सोन्याच्या किंवा काचेच्या आणि लाखेच्या अनेक बांगड्या… मोठी नथ (नाकातले दागिने) घालून त्या सजलेल्या…आणि झोकून झोका घेणाऱ्या नवविवाहीत व सौभाग्यवती व उपवर तरुणी…… पतीच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी दिवसभर उपवास करून पूजा करण्यासाठी त्या नटून-सजून तयार होतात.
सूर्यास्तानंतर घराच्या भिंतीजवळ मातीच्या साहाय्याने एक लहान तलाव (पाळ) तयार केला जातो. त्यात कच्चे दूध व पाणी टाकले जाते. त्या तलावापाशी लिंबाची लहान फांदी (नीमडी माता) रोवून तिची पूजा केली जाते. भिंतीवर कुंकू, मेहंदी आणि काजळाच्या १६-१६ बिंद्या लावतात. माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्तीची स्थापना करून ‘तीज माता व्रत कथा’ ऐकली जाते. विधी पूर्ण झाल्यावर, त्या गोड सत्तू लाडू/पिंडा खाऊन आपला उपवास सोडतात. माहेरून येणारा ‘सिंजारा’ व सासरच्या लोकांसोबत मिळून केली जाणारी पूजा यामुळे दोन कुटुंबांमधील नाते आणि प्रेम अधिक घट्ट होते.
हा सत्तू लाडू/पिंडा भाजलेल्या गहूं, तांदूळ, हरभरा डाळ किंवा दालीया अशा तीन पीठापासून, साखर, वेलची पूड व तूप वापरून बनवला जातो. विशेष म्हणजे गव्हाचे, तांदळाचे आणि हरभरा डाळीचे हे सर्व वेगवेगळे तयार केले जातात. सुपारी किंवा खोबरा डोल मध्ये ठेवून घुमटासारखा आकार दिला जातो. याला पींडा म्हणतात. हा पींडा सुक्या बिया व सुकामेवा लावून सजवले जाते. भाजलेल्या सत्तूची आणि वेलची पूडची चव अप्रतिम लागते….मी भाग्यवान आहे की राजस्थानी समाजात जन्माला आले सत्तू खाऊन मन तृप्त होते. सर्वांच्या सोबतच मी देखील दरवर्षी आतुरतेने वाट पाहतो……….
