Home१२ तास झाले ! अकोल्यात गुप्तांचा घरात दरोडा : आरोपी मोकाट ;विश्वासू...

१२ तास झाले ! अकोल्यात गुप्तांचा घरात दरोडा : आरोपी मोकाट ;विश्वासू हमालच मास्टर माईंड

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क ::Akola Crime News : शहरात भल्या सकाळीच एक अतिशय धक्कादायक, व्यावसायिकांमध्ये दहशत व पोलीस प्रशासनाला आव्हान देणारी घटना होऊन जवळपास १२ तासांचा कालावधी लोटला आहे. मात्र पोलिस आरोपींना अटक करण्यात यशस्वी झाले नाहीत.गेल्या चार ते पाच वर्षांपासून विश्वासाने कामावर ठेवलेल्या एका हमालानेच आपल्या मालकाचा विश्वासघात करत घरामध्ये दरोडा टाकल्याचा आरोप आहे. मालकाचे हात-पाय बांधून तब्बल 50 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 4 लाख रोख रक्कम लंपास करण्यात आली. भरसकाळी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अकोल्यातील रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहता मिल रोड, नया जीन परिसरात विजयकुमार गुप्ता वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराच्या खालीच ‘गुप्ता फ्लॉवर ऑइल इंडस्ट्रीज’ नावाने व्यवसाय चालवतात. नेहमीप्रमाणे आज सोमवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास गुप्ता आपल्या कामगारांना कामाच्या सूचना देण्यासाठी खाली आले होते. मात्र, त्याच वेळी दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला चढवला.

विश्वासू हमालच निघाला मास्टरमाईंड
विजयकुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरोड्याचा मुख्य सूत्रधार त्यांच्याकडे गेल्या चार ते पाच वर्षांपासून हमालीचे काम करणारा कामगारच आहे. मागील काही दिवसांपासून तो एका नवीन अज्ञात व्यक्तीला सोबत घेऊन येत होता. सोमवारी सकाळी त्याने आणखी एका साथीदाराला सोबत आणले आणि तिघांनी मिळून थेट घरात प्रवेश केला.

घरात शिरताच या तिघांनी गुप्ता यांना जबर मारहाण केली आणि त्यांचे हात-पाय घट्ट बांधून एका खोलीत डांबून ठेवले. मालकाला असहाय्य केल्यानंतर आरोपींनी घरातील तिजोरीवर डल्ला मारला. यामध्ये गुप्ता यांचे अडीच लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीचे दीड लाख रुपये अशी मिळून एकूण 4 लाखांची रोकड आणि 50 लाखांचे मौल्यवान सोन्याचे दागिने घेऊन आरोपी पसार झाले.

पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध
भरदिवसा घडलेल्या या मोठ्या दरोड्याची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण घराची पाहणी केली असून आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

पूर्वनियोजित कट होता का?
घरातील तिजोरी कुठे आहे आणि ऐवज कुठे ठेवला आहे, याची खडान् खडा माहिती आरोपींना आधीपासूनच होती का? हा दरोडा पूर्ण नियोजित कटाचा भाग होता का? अशा सर्व मुद्द्यांवर आता पोलीस अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत. या घटनेमुळे अकोल्यातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular