अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : गणेशोत्सवाची परंपरा जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश भावी पिढीच्या मनामनात रुजविणारा ऐतिहासिक उपक्रम शुक्रवारी अकोला शहरात साकारला. तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने शाडू मातीच्या गणेशमूर्ती घडवित पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा महासंकल्प केला. शहरातील चार ठिकाणी एकाच वेळी झालेल्या या भव्य कार्यशाळेमुळे अकोल्याच्या सामाजिक व पर्यावरणीय चळवळीला नवे पर्व मिळाले. अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाच्या पुढाकारातून निलेश देव यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. गतवर्षी १० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्यानंतर यंदा हा आकडा दुप्पट करीत २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यात आला.

तापडिया नगरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे पटांगण, जानोरकर मंगल कार्यालय, व प्रभात किड्स स्कूल या ४ ठिकाणी एकाच वेळी कार्यशाळा पार पडल्या. शाडू माती, पाट, आईस्क्रीमचा चमचा, टूथपिक आदी साहित्याचा वापर करून प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती साकारल्या. पीओपीमुळे होणारे जलप्रदूषण टाळणे, शाडू मातीचा गणपती व घरातच विसर्जन आणि विसर्जनानंतर त्याच मातीत तुळशी सारखी रोपे लावणे, असा पर्यावरणपूरक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

स्वतःच्या हाताने घडविलेला गणपती विद्यार्थ्यांसाठी केवळ एक कलाकृती नव्हती; तर मातीशी नाते जोडणारा, भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी समजावून देणारा संस्कार सोहळा ठरला. गतवर्षीच्या १० हजारांवरून यंदा २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला हा प्रवास पर्यावरण संवर्धनाच्या विचाराला मिळालेला व्यापक प्रतिसाद अधोरेखित करणारा ठरला. कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक व प्रशिक्षक शरद कोकाटे यांच्यासह प्रा. डॉ. ज्ञानसागर भोकेर, प्रा. गजानन बोबडे, श्रीमती कल्पना राव, सौ. अमृता सेनाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले.

आज पासून तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’ : आज शनिवारपासून ६ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चा भव्य शुभारंभ करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तापडिया नगर येथे आयोजित ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’ हा ‘महिलांच्या हाताला काम, उत्पादनाला बाजार आणि कष्टाला योग्य मोबदला’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला. हस्तकला, गृहउद्योगातील उत्पादने, घरगुती वस्तू, वस्त्र, खाद्यपदार्थ आणि महिलांनी स्वतः तयार केलेल्या विविध उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली.
मान्यवरांची उपस्थिती; उपक्रमाला व्यापक पाठबळ. : कार्यक्रमाचे संचालन दिलीपराव देशपांडे यांनी केले, तर सौ. रश्मी देव यांनी प्रस्तावना केली. कार्यक्रमाला प्रा.अंजलीताई आंबेडकर, अरुंधती शिरसाट, प्रमोद देंडवे,अनिल पिंपळकर,जयंत सरदेशपांडे, निलेश देव,पराग गवई, जयश्री बहादुरकर, शेख शमशु शेख साबीर, उज्वला पातोडे, आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय वैशाली उमरेकर, सुवर्णा नागपुरे, दीपली वाकारे, प्रतिमा मांढणे, दिवाकर पाटील, अखिलेश परिका, शारदा बियाणी, दिनेश पारेख, किशोर विभुते, मेघा नंद, कल्पना राव, पल्लवी केदारे, हेमा शाह, प्रतीक वाघ, रतन लोखंडे, ज्योती मुरारका, स्वाती दिक्कर, मंगेश सिंगनाथ, माधव पाटील, मिलिंद शिरभाते तसेच कार्यकर्ते, शिक्षक, स्वयंसेवक व सहकाऱ्यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

अकोल्यातून महाराष्ट्राला त्रिसूत्री संदेश ! गणेशोत्सवाची परंपरा थांबवायची नाही—ती पर्यावरणपूरक बनवायची; संस्कृती विसरायची नाही—ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवायची; आणि महिलांना केवळ मदत करायची नाही—तर त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ देऊन आत्मनिर्भर बनवायचे.याच त्रिसूत्री विचारातून साकारलेला हा उपक्रम अकोल्याच्या सामाजिक क्षेत्रातील आगळावेगळा प्रयोग ठरला.
