Homeपंखांमध्ये बळ असेल तर आभाळही ठेंगणे.... ! अकोल्याच्या लखन चितलांगेचे दैदिप्यमान यश

पंखांमध्ये बळ असेल तर आभाळही ठेंगणे…. ! अकोल्याच्या लखन चितलांगेचे दैदिप्यमान यश

अकोला दिव्य : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : जिद्द आणि परिश्रमाची गाथायश हे कोणा एकाची मक्तेदारी नाही.आणि ते मिळवण्यासाठी केवळ सुख-सोयींचीच गरज असते असे नाही. अत्यंत सामान्य, प्रतिकूल किंवा मध्यमवर्गीय परिस्थितीत राहूनही, जर मनात जिद्द आणि हातामध्ये कठोर परिश्रमाची तयारी असेल, तर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठता येते. अशाच परिस्थितीतून निर्माण झालेले यश हे अधिक प्रेरणादायी आणि टिकणारे असते.

अकोला दिव्य छायाचित्र

रात्रीचा दिवस करून मिळवलेले यश हे केवळ गुणांचे नसते, तर ते संयमाचे व कष्टाचे प्रतीक असते. हे शैक्षणिक यश व्यक्तीला केवळ पदवी देत नाही, तर समाजात मान-सन्मान आणि स्वाभिमानाने जगण्याची ताकद देते. जेव्हा एखादी व्यक्ती सामान्य पार्श्वभूमीतून येऊन मोठे यश संपादन करते, तेव्हा ती संपूर्ण समाजासाठी एक आदर्श बनते. स्वतःवर असलेला विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न कधीही वाया जात नाहीत. कर्तृत्वाला कोणत्याही मर्यादेचे बंधन नसते आणि पंखांमध्ये बळ असेल तर आभाळही ठेंगणे वाटते. ‘परिस्थिती कशीही असो, जर मनात जिद्द आणि प्रयत्नांमध्ये सातत्य असेल, तर कोणतेही ध्येय अशक्य नसते,’ हे अकोल्याच्या लखन किरण राजेंद्र चितलांगे याने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.

लखन याने अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत, एकाच वेळी दोन मोठ्या स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून संपूर्ण जिल्ह्याचा आणि चितलांगे कुटुंबाचा नावलौकिक वाढवला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) घेण्यात आलेल्या अत्यंत कठीण अशा UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षेत (Engineering Services Examination) देशभरातून सुमारे १ लाख ८० हजार उमेदवारांनी नशीब आजमावले होते. या अत्यंत आव्हानात्मक परीक्षेतून केवळ १ हजार ७८६ उमेदवार उत्तीर्ण झाले, ज्यामध्ये लखनने आपले स्थान निश्चित करत यशाला गवसणी घातली आहे. लखनचे यश एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, तर राज्य स्तरावर झालेल्या नगर परिषद अभियांत्रिकी सेवा परीक्षेतही त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले. या परीक्षेसाठी राज्यभरातून २६ हजार ३९८ उमेदवार बसले होते, ज्यामधून केवळ ३१५ अंतिम उमेदवारांची निवड करण्यात आली. या अत्यंत अटीतटीच्या निवडीत लखनने बाजी मारत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.आज लखन चितलांगे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्यजल वाहिनी विभागात उपअभियंता (वर्ग २) या पदावर कार्यरत आहे.

लखनचे हे यश केवळ त्याचे वैयक्तिक यश नसून, ते त्याच्या कुटुंबाचे, मित्रपरिवाराचे माहेश्वरी व राजस्थानी समाज आणि संपूर्ण अकोलावाशियांसाठी अभिमानास्पद आहे. सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही, कोणत्याही अडचणींना न जुमानता त्याने मिळवलेले हे यश स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या इतर हजारो तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्याच्या या शैक्षणिक आणि सामाजिक यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सामान्य परिस्थितीतून प्रवास सुरू करून, केवळ स्वतःच्या कठोर परिश्रमाच्या, अभ्यासातील सातत्याच्या आणि अढळ जिद्दीच्या जोरावर लखन ने शिखर सर केले आहे. हे यश केवळ शैक्षणिक नसून, समाजातील प्रत्येक गरजू व होतकरू विद्यार्थ्याला ‘प्रयत्नाने काहीही साध्य होऊ शकते’ हा विश्वास देणारे एक मोठे सामाजिक यश आहे. या दैदिप्यमान यशाचा ‘अकोला दिव्य’ला सार्थ अभिमान आहे. आगामी काळात अधिकारी म्हणून देशसेवा करताना तुमच्या हातून अशीच लोककल्याणकारी कामे घडोत आणि तुमच्या कारकिर्दीचा आलेख नेहमी उंचावत राहो, हीच अकोला दिव्य परिवारातर्फे सदिच्छा !

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular