अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : देशभरात कालपर्यंत ‘चुल आणि मुलं’ या परिघात बांधून केवळ पोथ्या-पुस्तकात केवळ ‘नारीशक्ती’ नावाने उदोउदो करून एका चाकोरीत बंदिस्त करून ठेवलेल्या महिलांनी, स्वबळावरच घेतलेली भरारी पितृसत्ताक मानसिकतेला सुरुंग लावून आपलं अस्तित्व आणि कर्तृत्व सिद्ध केले आहे.बिहारचे वरीष्ठ नेते लालुप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य हिने २०२२ मध्ये आपलं यकृत वडील लालूप्रसाद यांना देऊन त्यांचा जीव वाचवला. रोहिणी आचार्य हिच्या प्रमाणे वाशिम येथील निकिताने यकृत देऊन आपल्या वडिलांचे पितृऋण जोपासलं आहे.

कोमल हैं कमजोर नहीं शक्ती का नाम ही नारी है ! असं उगीचच म्हटलं जातं नाही तर वेळोवेळी महिलांनी स्वबळावरच आपल्यातील दुर्दम्य इच्छाशक्ती अनुभव इतरांना आणला आहे. वडिलांनी बोट धरून लेकीला चालायला शिकवलं, त्याच वडिलांची आयुष्याची वाट खडतर झाली, तेव्हा हीच लेक त्यांच्यासाठी जीवनदात्री ठरली. गंभीर आजारामुळे यकृत निकामी होण्याच्या मार्गावर असताना मुलीने क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या यकृताचा एक भाग वडिलांना दान करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि वडिलांना नवजीवन प्राप्त झाले. वडील-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि धैर्याची ही कथा अवयवदानासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
वाशीम शहरातील शासकीय सेवानिवृत्त अधिकारी संजीवकुमार नांदगावकर यांना गंभीर आजाराने गाठले होते. यकृताची कार्यक्षमता खालावत गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. उपचारांसाठी यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचे स्पष्ट झाल्याने कुटुंबासमोर मोठे आव्हान उभे राहिले. या कठीण परिस्थितीत निकीताने स्वतःच्या यकृताचा एक भाग वडिलांना दान करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेची भीती, स्वतःच्या आरोग्याची चिंता या सगळ्यांवर मात करत मुलीने वडिलांचे जीवन वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले.
शस्त्रक्रियेचा दिवस संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत भावनिक होता. पत्नीच्या डोळ्यांत अश्रू, लेक आणि वडिलांना नवजीवन मिळाले. एका सुनेच्या मनात चिंता, तर वृद्ध आईच्या मनात अस्वस्थता होती. या कठीण काळात मुलानेही अत्यंत धैर्याने पुढाकार घेत वैद्यकीय उपचारांशी संबंधित बाबी तसेच धास्तावलेल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. निकिताने दान केलेल्या यकृताच्या भागामुळे लेकीच्या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलला.

अवयवदानाचा समाजासमोर आदर्श : आजच्या वैज्ञानिक युगात समाजात अवयवदानाबाबत जनजागृती होणे आणि त्यासंदर्भातील गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. योग्य वैद्यकीय मार्गदर्शन व प्रक्रियेतून केलेले अवयवदान एका गरजू व्यक्तीसाठी जीवनाची नवी आशा ठरू शकते. निकिता यांनी आपल्या कृतीतून अवयवदानाचा आदर्श समाजासमोर ठेवला असल्याची चर्चा शहरात होती.
