अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोला शहरातील ऐतिहासिक असदगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी तसेच परिसरातील अतिक्रमणे, अस्वच्छता व अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तातडीने पुरातत्त्व विभाग, महापालिका व प्रमुख पोलीस अधिकारी यांच्यासह तातडीने पाहणी केली.पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून किल्ल्याच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. दरम्यान किल्ल्याची दुरवस्था, अस्वच्छता, वाढलेली अतिक्रमणे आणि या ऐतिहासिक वास्तूंचे होणारे नुकसान टाळता संवर्धन व सुशोभीकरणासाठी उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने जिल्हाधिकारी मीणा यांना निवेदन दिले. या निवेदनाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अवघ्या तासाभरात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. या परिसरात समाजकंटकांकडून दारूचे सेवन, गांजासारख्या अमली पदार्थांचा वापर, अश्लील वर्तन तसेच इतर गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारीही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूच्या सुरक्षिततेबरोबरच परिसरातील पर्यटक व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

किल्ला परिसरात अवैध धंदे व बेकायदेशीर प्रकारांना प्रतिबंध करणे, रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढविणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, परिसरात योग्य प्रकाश व्यवस्था व नियमित स्वच्छता राखणे या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. असदगड किल्ला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग असून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना करून सुशोभीकरण व नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ वातावरण निर्माण करावे,अशी मागणी करण्यात आली.

असदगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन आवश्यक ती कार्यवाही निश्चितपणे केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. प्रशासनाने निवेदनाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी केल्याने सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे बजरंग दलाकडून सांगण्यात आले. यावेळी बजरंग दलाचे विदर्भ प्रांत सहसंयोजक सुरज भगेवार, विभाग संयोजक हरिओम पांडे, जिल्हामंत्री निलेश पाठक, श्रेयस शांडिल्य, अमर कुकरेजा, पवन वाडेकर, राजेश उदापुरे, किशोर अलिमचंदानी, नंदकिशोर बोर्डे, तेजस राऊत, संतोष बुरडे, प्रदिप शुक्ला, धनंजय चांदवडकर, मनोज अहिर उपस्थित होते.