अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : गजानन सोमाणी एडिटर इन चीफ खरं सांगू का, आज मन अस्वस्थ झालं आहे. कुठल्याही बाजूने समर्थनीय नसलेले, दिल्लीत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अमानवीय प्रकारामुळे आमच्या भावी पीढीच्या भवितव्याचा विचार करून करून डोकं गरगरतयं ! अक्षरशः किळसवाणे होत आहे. अगतिक होतोय ! चिढ वाढतं आहे ! आता या आंदोलनात सहभागी असलेल्या आमच्याच मुलामुलींवर सरकारी संपत्तीचे नुकसान केले म्हणून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. हा कायदा आहेच मात्र अनेकदा कायदा पाहिजे तेव्हा, पाहिजे तसा वाकवून कारवाई केली जाते. हे देखील नाकारता येत नाही.

आंदोलक विद्यार्थ्यांना कारवाईची भिती दाखवून, आंदोलन दडपून टाकण्यासाठी जर असे गुन्हे दाखल करण्यात आले. तर हिंदू राष्ट्राची पायाभरणी आमच्या मुलांच्या भविष्याची राखरांगोळी करुन खुश व्हा ! हे राष्ट्र तुम्हालाच लखलाभ हो ! माफ करा पण हे दिसतं आहे. आज अहंकारी राजा आणि त्याच्या मस्तावलेल्या प्रधानाने जरा नमतं घेऊन, मनाचा मोठेपणा दाखवून आंदोलन स्थळी गेले असतें तर ते अधिक मोठे झाले असते. वय,अनुभवाने शहाणे म्हणजेच मोठेपण आहे. वयाने लहान, अनुभव शून्य मुलामुलींशी चर्चा करून, ऐकून घेऊन दिलासा दिला असता तर, तर मुळीच लहान बापाचे झाले नसते ! घरात जर वारंवार मायबाप लेकरांना धाकदपटशा करतं असेल तर…, तर तेव्हा घरात बंडखोरी होतेच.

सर्वात मोठं आश्चर्य वाटले की या आंदोलनात नेम प्लेट नसलेले आणि चेहरा व पोशाखानेच गुंड मवाली दिसतं असलेलेच बेछूटपणे मारपीट करीत आहेत. महिला पोलिस असताना मुलींना ओढत होते. लाठी टोचत होते. हेच गुंड सरळसरळ गाड्यांची तोडफोड व सरकारी संपत्तीची नासधूस करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. एकमात्र खरं की,दिल्ली पोलिस हलक्याफुलक्या हाताने पिटाळून लावत आहेत. पोलिस एवढे निष्ठूर नाहीत. हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. तेव्हा दिल्ली पोलिस प्रशासनाचे उच्च पदस्थ अधिकारी स्वतःची आणि पोलीस दलाची प्रतिमा मलिन का करून घेत आहेत.

पोलिसांनाही मुलबाळ आहेत.ते देखील कुटुंब-कबिल्याचे महत्त्व जाणून आहेत. तेव्हा येणाऱ्या काळात जर पोलिसांच्या मुलामुलींच बर वाईट झालं तर लोक वाचण्यासाठी येणार काय ?
सहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा एकुलता एक मुलाने आत्महत्या केली…….मग हे पद, रूबाब आणि बक्कळ पैसा काय कामाचा. स्वतःचा स्तोम माजवून घेणा-याचे इतके ऐकू नका की नंतर पश्चात्तापा शिवाय काहीच शिल्लक नसेल. आधी माणूस म्हणून जगा ! एका प्रधानचा मंत्रीपद निरागस मुलांच्या मृत्यू पेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे काय ?

अमर अमरपट्टा कोणीही घेऊन आला नाही. असे महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारे स्व अजित पवार वारंवार सांगत असत. आज दादाची जयंती साजरी करण्याचा बाका प्रसंग आला आहे. काळ आपला डाव टाकून आहे फक्त आम्हाला वेळ माहित नाही. पण काळाचा वार निश्चित आहे. हे लक्षात ठेवा ! जगाच्या पाठीवर सर्वात मोठा हा धर्म मानवता धर्म आहे. आमच्या पुरोगामी महाराष्ट्रातील संतांनी आम्हाला हीच शिकवण दिली असून, ‘महा-राष्ट्र’च्या बोली भाषेत सांगायचे तर म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो.
जय हिंद! वंदे मातरम्