अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्यासोबत दैनंदिन विविध समस्या आणि आवश्यक अशा सोयीसुविधासाठी कार्यरत असलेल्या अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) च्या निवडणुकीत डॉ. पवन अशोक मानकर यांची सर्वानुमते अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीमध्ये डॉ. शुभम माहूरकर यांची सरचिटणीस तर डॉ. नम्रता आगळे व डॉ. हर्षल चव्हाण यांची उपाध्यक्ष आणि डॉ. संग्राम वाघ यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. पवन अशोक मानकर यांनी सर्व निवासी डॉक्टरांनी टाकलेला विश्वास आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले. निवासी डॉक्टरांच्या वसतिगृह, सुरक्षा, पायाभूत सुविधा, शिष्यवृत्ती तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

नवनिर्वाचित कार्यकारिणीने सर्व निवासी डॉक्टरांच्या हितासाठी पारदर्शक, सकारात्मक आणि सर्वसमावेशक पद्धतीने कार्य करण्याची ग्वाही दिली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.