Sunday, July 12, 2026
No menu items!
No menu items!
Homeएक 'तुकाराम' व्यवस्था बदलू शकतो, मग.........

एक ‘तुकाराम’ व्यवस्था बदलू शकतो, मग………

अकोला दिव्य : गजानन सोमाणी एडिटर इन चीफ : भारतातील इंग्लिश राजवट जाऊन ७९ वर्षे झालीत. संपूर्ण भारतीयांच्या सर्वांगीण विकासासोबतच देशाचा सर्वंकष विकास करणे, यादृष्टीने लोकाभिमुख व गतिमान शासन-प्रशासन आणि सुरक्षित व सुरळीत कारभार होण्यासाठी संविधान मिळाले.लोकशाहीची स्थापना झाली. निवडणुका सुरू झाल्या.सरकारे बदलली.चेहरे बदलले.पक्ष बदलले; पण सामान्य माणसाच्या नशिबी आलेले प्रश्न मात्र फारसे बदलले नाहीत. उलट कोठे त्यात वाढ झाली. तर कोठे ते अधिक गडद होऊ लागले आहेत. दररोज जनतेच्या आशा आकांक्षांचा बाजार मांडल्या जातोय. दर तासाला भ्रष्टाचाराची वेल अधिकाधिक फोफावत जात बघता बघता लालफितशाहीचे जाळे इतके घट्ट झाले आहे की, लोकांच्या जीवन मरणाशी निगडीत प्रश्नांची देखील वाट लागते आहे.

प्रत्येक निवडणुकीत हमखास परिवर्तनाची भाषा बोलली जाते. प्रचारात क्रांतीच्या आरोळ्या दिल्या जातात, ‘भ्रष्टाचार संपवून, ‘व्यवस्था बदलू’, ‘जनतेला नाय देऊ’ अशा घोषणा केल्या जातात. पण सत्तेच्या खुर्चीवर बसल्यानंतर अनेकांच्या भाषेचा सूर बदलतो. विरोधी पक्षात असताना जे महत्त्वाचे वाटतात, तेच सत्तेत गेल्यावर गौण ठरत आहेत. तेव्हा मग प्रश्न पडतो की, व्यवस्थेला वठणीवर येण्याऐवजी रसातळाला जात आहे. तेव्हा सत्ताहाती असलेल्या या लोकांनी बांगड्या भरल्या आहेत का ? असो, विषय असा आहे की, शासन व प्रशासन हे एका व्यवस्थेची दोन चाक असून जर शासन नावाच्या चाकाचे मोडकळीस येत आहे. तर संविधानाने दिलेले अधिकार वापरून, प्रशासन सर्वसामान्यांच्या हिताचे खरंच रक्षण करीत आहेत की, केवळ शासनाची जी हुजरेगिरी ! हा मुद्दा आहे.

आज महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात अन्न व औषधी प्रशासन नावाचा देखील विभाग आहे, हे दूरवर खेडूताला देखील माहित झाले. कारण प्रशासनातील एक अंग असलेल्या एका विभागाने सुरू केलेल्या कायदेशीर कारवाई मुळेच ना ! महाराष्ट्र राज्यात अन्न व औषध प्रशासन विभाग सुरूवातीपासून आहे. मात्र खाल्ल्या जाणारे सर्वच प्रकारातील खाद्यपदार्थ तसेच सगळेच सौंदर्य प्रसाधने इत्यादी उत्पादनावर हा विभाग मोठी देखील कारवाई करू शकतो, हे मध्यमवर्गीयांना आता लक्षात आले आहे. अन्न व औषधी प्रशासन आयुक्त नावाचं पद असते. हे आमच्याच नव्हे तर शेजारच्या राज्यातील लोकांनाही माहिती झाले आहे. असं म्हटलं जाते की, सिंहासनाला तेज नसते, त्यावर बसलेल्या व्यक्तीच्या चारित्र्याने ते सिंहासन तेजस्वी होते. आणि अन्न व औषधी प्रशासनाचे‌ आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने हे तेजोवलय मिळवून दिले.

लोकशाहीमध्ये ‘अमर’ वा ‘अमर्याद’ अधिकार कोणालाच नसतात. विशेषत्वाने एक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना तर मुळीच नाही. संविधानाच्या चौकटीत शासकीय सेवक म्हणून समाजाला प्रगतीच्या सर्वोच्च पातळीवर नेणं हे, पगार घेणाऱ्यांचे कर्तव्यच आहे ना ! समाजाला योग्य मार्गदर्शन करणं, त्यांना ताकद देणं हे काम आहे. समाज जेवढा विकसित होईल, तेवढाच आपला देश आणि पर्यायाने प्रत्येक व्यक्ती विकसित होईल, लोक आनंदी राहतील.या हेतूने लोकशाहीतील नोकरशाहीचे हेच कर्तव्य असता, महाराष्ट्रातील वा देशातील नोकरशाही आपलं कर्तव्य कसं पुर्ण करत आहेत, हे तुकाराम मुंढे यांच्या कर्तृत्वानिष्ठेला बघितल्यावर सहजपणे फरक लक्षात येते.

घेतला वसा टाकू नये, या तत्त्वावर वाटचाल करणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रातील भेसळ करणाऱ्या माफियांची झोप उडवून दिली आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्य पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला की, संविधानाला सर्वोच्च स्थानी राखून महाराष्ट्रातील विविध विभागांच्या किती आयुक्तांनी आजवर लोकांच्या हितासाठी अशा किती कारवाया केल्यात.घेतला वसा टाकू नये, या मार्गावर वाटचाल करणाऱ्या तुकाराम मुंढे यांनाही संसार थाटला आहे. त्यांनाही कुटुंब-कबिला असूनही ते आपल्या कर्तव्यापासून विन्मुख झाले नाही तेव्हा इतरांकडून अशी रास्त अपेक्षा ठेवणे चुकीचा ठरणार ?

महाराष्ट्रामध्ये कारवाईचा धडाका लावणारे तुकाराम मुंढे हे राज्याचे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांची आजवर अनेकदा बदली झाली आहे. बदली झाल्यानंतर अनेकदा माणूस म्हणून त्रास होतोच. पण मुंढेनी हा त्रास सहन करुन आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. प्रशासनात कोणतीही जबाबदारी दिली, तर ती मुंढे यांनी तेवढ्याच ताकदीने निभावली.जर तुकाराम मुंढे हे करु शकतात तर इतर का नाही ? प्रत्येक दिवशी कामाचा स्तर ‘एक इंच’ पुढे कसा नेता येईल, याचा विचार किती करतात ? प्रशासनात काम करताना संपूर्ण पारदर्शकता राखणे आणि दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे यालाच जर प्राधान्य दिले तर अर्ध्याहून अधिक समस्यांना पुन्हा पुन्हा तोंड द्यावेच लागणार नाही.मात्र यासाठी हवी कर्तृत्वाची धमक आणि….. आणि……..असो !

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर राज्यभरात तुकाराम मुंढे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी प्रचलित कायद्याचाच वापर करून त्यांनी सध्या राज्यात कारवाईचा धडाका लावला आहे. भेसळ करणाऱ्यांवर दररोज धाडी पडत असून कोट्यवधींचा माल जप्त व नष्ट केला जात आहे.अन्न,औषधे, दूध, खवा इत्यादीसह भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारत अनेकांना जेलमध्ये पाठवले. एवढेच नव्हे तर काही मोठ्या कंपन्या, उद्योग हॉटेलवरही त्यांनी कारवाई केली आहे.

तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज वृत्ती केवळ याच विभागात नाही तर यापूर्वी त्यांना ज्या ज्या विभागाची जबाबदारी मिळाली होती, त्या सर्व ठिकाणी त्यांनी अशीच कामगिरी केली होती. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाच्या कामकाजाबाबत त्यांनी नुकतीच आपली भूमिका मांडली आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत त्यांनी भेसळ, त्याविरोधातील कायदे आणि कारवाई याची सविस्तर माहिती दिली.

मानवाच्या आरोग्यावर विपरित परिणाम
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर विकासाचे अनेक टप्पे गाठले. लोकांचे सरासरी आयुष्यमान वाढले आहे. जीवनमान उंचावले असले तरी त्याचा दर्जा वाढलेला नाही. स्वातंत्र्याच्यावेळी संसर्गजन्य रोगांचे प्रमाण अधिक होते.आता खूप कमी झाले आहे. पण जीवनशैलीशी निगडित आजारांचे प्रमाण ६० ते ७० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. चांगली जीवनशैली म्हणजे फक्त व्यायाम करणे एवढेच नसते. तर त्याबरोबरच आपण काय खातो आणि काय पितो, हे देखील महत्त्वाचे असते. यावर आपले आयुष्य, आपले शरीर निगडित असते. या सर्व गोष्टींचा संबंध अन्न व औषध प्रशासनाशी आहे. पूर्वी घरात खावे आणि बाहेर खेळण्यासाठी जावे, असे म्हणत होते. आज उलट झाले आहे. लोक आज बाहेर जेवायला जातात व करमणूक म्हणून घरातच टीव्ही पाहतात किंवा गेम खेळतात. यामुळे मानवी शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत.

आजच्या जीवनशैलीमुळे आणि सार्वजनिक स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने आरोग्य धोक्यात येत असताना, नवजात बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांशी येतो. दूध पिण्यापासून ते अन्नाच्या सेवनापर्यंत ते औषध घेण्यापासून ते उपचारापर्यंत अन्न व औषध प्रशासनाचा संबंध आहे. तेव्हा मुंढे यांनी सुरू केलेल्या कारवाईमागे निश्चितच कुणाचा तरी जीव वाचविण्याची भूमिका आहे. जर एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे कुणीतरी जीव गमावू शकतं, तर योग्य गोष्टीमुळे जीव वाचू शकतात. त्यामुळेच जिवंत शरीरात भेसळीच्या माध्यमातून विष जाऊ नये या दृष्टीने तुकाराम मुंढे यांच्या कारवाईला पाठबळ देणे काळाची गरज आहे. सत्तापक्ष आणि विरोधी पक्षनेते यांनी येणाऱ्या काळात राजकीय किंवा आर्थिक फायद्यासाठी जर खिळ घातली गेली तर………… तर सगळं काही विसरून अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदावर किमान ३ वर्षे तुकाराम मुंढे यांनाच कायम ठेवण्यासाठी जन आंदोलन व्हायलाच हवे.

मुंढे यांनी ग्राहकांना केले आवाहन
तुकाराम मुंढे यांनी यावेळी ग्राहकांनाही एक महत्त्वाचे आवाहन केले. मी आयुक्त म्हणून माझी जबाबदारी पार पाडत आहे. आमचा विभागही योग्यरितीने कारवाई करत आहे. मात्र आता ग्राहकांनीही जागृत व्हायला हवे. आपण जी गोष्ट विकत घेतो, ती योग्य आहे की अयोग्य, हे पाहायलाच हवे. तसेच आपण जे खात आहोत, त्यात कोणते पदार्थ आहेत, हे पाहायला हवेच. आपण कपडे विकत घेताना जितकी काळजी घेतो, त्यापेक्षा जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!