किसनराव हुंडिवाले हत्याकांड ! आरोपी तोंडेचा अर्ज फेटाळून लावला

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : बहुचर्चित किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी प्रतीक दयाराम तोंडेने या शिक्षेचा विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान दाखल याचिकेवर निर्णय होईस्तोवर शिक्षेचे निलंबन मंजूर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाखल केलेला अर्ज न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके व न्यायमूर्ती निवेदिता पी.मेहता यांच्या खंडपीठाने फेटाळून लावला आहे.

या प्रकरणातील आरोपी प्रतीक तोंडे याला कनिष्ठ न्यायलयाने भारतीय दंड संहितेच्या कलम १४३ (बेकायदेशीर जमाव), १४७ (दंगल), ३०२ (खून) सह कलम १४९ (समान हेतू) व सार्वजनिक मालमतेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवले होते. या गुन्ह्यासाठी त्याला जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात त्याने अपील दाखल केले आहे. या अपिलावर निर्णय होईस्तोवर तोंडेच्या वतीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम ४३० अन्वये झालेल्या शिक्षेचे निलंबन मंजूर करण्यासाठी प्रस्तुत अर्ज दाखल केला होता.

सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले की, घटनेच्या वेळी इतर आरोपी मृतक हुंडीवाले यांच्यावर प्राणघातक हल्ला करत होते. त्याच वेळी तोडे याने फिर्यादी प्रवीण हुंडीवाले याला घट्ट पकडून ठेवले होते, जेणेकरून आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी प्रविण मध्यस्थी करू शकणार नाही.अपीलकर्त्याच्या वकिल व राज्याच्या सरकारी वकील यांचे म्हणणे ऐकल्यानंतर, तसेच ओमप्रकाश साहनी विरुद्ध जय शंकर चौधरी व अन्य यांच्या फौजदारी अपील क्रमांक १३३१-१३३२/२०२३, दिनांक ०२.०५.२०२३ रोजी दिलेल्या निर्णयात, शिक्षेच्या निलंबनाच्या अर्जासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या तत्त्वांचा विचार करता, न्यायालयाने स्पष्ट केले की, जमाव जमवणे, किंवा त्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी असे कृत्य घडण्याची शक्यता त्या जमावाच्या सदस्यांना माहीत असणे, अशा कोणत्याही बेकायदेशीर जमावाच्या प्रत्येक सदस्याला त्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले जाईल.तेव्हा त्यातील प्रत्येक सदस्यावर संयुक्त जबाबदारी येते. त्यामुळे जमावातील प्रत्येक सदस्य त्या गुन्ह्यासाठी तितकाच जबाबदार धरला जातो.

न्यायाधीशांनी सर्वोच न्यायालयाच्या विविध निकालांचे दाखले देत स्पष्ट केले की, या टप्प्यावर, पुराव्याचे पुनर्मूल्यांकन करणे अनुज्ञेय नसल्यामुळे, आणि प्रस्तुत अर्जदार/अपीलकर्त्याचा सहभाग दर्शवणारा पुरावा पुरेसा असल्याने, शिक्षेच्या निलंबनासाठी कोणताही खटला दाखल होत नाही. म्हणून, अर्ज फेटाळण्यात येत आहे.असा कायदेशीर आधार घेत न्यायालयाने प्रतीक तोंडेचा शिक्षा निंलबनाचा अर्ज फेटाळला.

मात्र आरोपी तोंडेने दाखल केलेल्या मुख्य अपिलवर आर अँड पी आधीच प्राप्त झाले आहे.तेव्हा कार्यालयाने कागदपत्रांची यादी तयार करावी आणि ती तयार झाल्यावर अंतिम निकालासाठी अपील सूचीबद्ध करावे.असेही आदेशात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here