Friday, July 10, 2026
No menu items!
No menu items!
Homeअकोल्यातील 12 जणांवर अवैध सावकारीचा गुन्हा दाखल ! पोलिसांची चौकशी सुरू

अकोल्यातील 12 जणांवर अवैध सावकारीचा गुन्हा दाखल ! पोलिसांची चौकशी सुरू

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : शहरात पठाणी व्याजापेक्षाही जास्त व्याजाची वसुली करून, अवैध सावकारीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मिळविल्याच्या आरोप लावत अकोला शहरातील १२ जणांचा विरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायदा, २०१४ अन्वये रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सहकारी विभागाच्या अकोला तालुका सहकारी संस्था उपनिबंधक यांनी केलेल्या सखोल तपासानंतर हा सगळा व्यवहार प्रथमदर्शनी अवैध सावकारीचा असल्याचे आपल्या अहवालात नमूद करून रामदासपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

अकोला तालुका सहकारी संस्थेचे उपनिबंधक यांनी संजय गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी घेतली. सुनावणीत अर्जदार व प्रतिवादी या दोघांचे लेखी व तोंडी जबाब, धाडीदरम्यान जप्त केलेली कागदपत्रे आणि इतर सर्व कागदपत्रांची तपासणी करून जिल्हा उपनिबंधक यांना ९ फेब्रुवारी २०२२ रोजी चौकशी अहवाल सादर करण्यात आला होता.

तालुका उपनिबंधकांनी पुढील कारवाईस्तव जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या चौकशी अहवालात नमूद केले की, प्रथमदर्शनीच संजय ज्ञानदेव गावंडे यांच्यासोबत अकोला शहरातील नझुल शीट क्रमांक ६३-बी, नझूल प्लॉट क्रमांक ५/२४ आणि ५/१ मधिल अंदाजे १९०० चौरस फूट जमिन व त्यावर बांधलेल्या दोन मजली घराशी संबंधित २८ जुलै २०१७ रोजी नोंदणीकृत इसार पावती आणि ४ मार्च २०२० रोजी नोंदणीकृत खरेदी खत हे सगळं अवैध सावकारी व्यवहारांमधून करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार सहकारी संस्था तालुका उपनिबंधक यांनी या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सहकारी विभागाने दिलेल्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलीस ठाण्यात अकोला शहरातील अरुण बालमुकुंद शर्मा, प्रभाकर देविदास पाठक, गजानन देविदास पाठक, मुकुंद देविदास पाठक, पवन बालमुकुंद शर्मा, दिगंबर माखनलाल शर्मा, अशोक श्रीराम शर्मा, नितीन प्रभुदयाल जोशी, प्रवीण निकम, रोशन राममूरत शर्मा आणि गोपाल हरिराम शर्मा असे एकूण १२ जणांचा विरोधात उपरोक्त सहकार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा रामदासपेठ पोलीस यांनी तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!