अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : युवकांचे सशक्त संघटन, विद्यार्थी आंदोलनांचे नियोजन, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग संघटन कौशल्य, अभ्यासपूर्ण वक्तृत्व आणि नेतृत्वगुण यांची दखल घेऊन गौरी सरोदे यांची महाराष्ट्र प्रदेश नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या प्रदेश महासचिवपदी निवड करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक उपक्रमांच्या आयोजनात गौरी सरोदे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘युवा संगम’ आणि ‘संविधान से समाधान’ यांसारख्या विशेष शिबिरांचे आयोजन, ‘२१ पदकांचा गणपती’ उपक्रम, वृक्षारोपण कार्यक्रम, ‘छत्रपती ते घटनापती प्रबोधन वारी’चे नियोजन तसेच नवरात्रीदरम्यान राबविण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. अकोल्यात विद्यार्थ्यांना संघटित करून विद्यार्थी आंदोलनाचे नियोजन करणे, यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
युवकांमध्ये स्वावलंबनाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने गौरी सरोदे यांनी अकोल्यात ‘चरखा संघा’ची स्थापना केली. या उपक्रमांतर्गत दर रविवारी तरुण एकत्र येऊन महात्मा गांधी यांच्या स्वावलंबनाच्या विचाराचे प्रतीक असलेला चरखा चालवतात. या माध्यमातून युवकांना सामाजिक आणि वैचारिक उपक्रमांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि निर्भीडपणे भूमिका मांडण्याची वृत्ती या गुणांच्या बळावर गौरी सरोदे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र NSUI ने त्यांची प्रदेश महासचिवपदी निवड केली आहे.

या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, संघटनात्मक कार्याला अधिक व्यापक स्वरूप देणे आणि सामाजिक उपक्रमांना चालना देणे, यासाठी त्या कशा प्रकारे योगदान देतात, याकडे अकोल्यातील विद्यार्थी व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
