Home'पौराणिक' रावण ! आजचं रावण 'दहन' हा तर श्रीरामांच्या विचारांचाच अपमान नाही...

‘पौराणिक’ रावण ! आजचं रावण ‘दहन’ हा तर श्रीरामांच्या विचारांचाच अपमान नाही का ?


अकोला दिव्य : गजानन सोमाणी एडिटर इन चीफ : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची मोठी परंपरा असून अलिकडच्या काळात रावण दहनाचे स्तोम माजवले आहे. अनेकदा या परंपरेला ‘सनातनी मानसिकतेचा शोध’ किंवा केवळ ‘आनंद साजरा करण्याचे साधन’ म्हणून पाहिले जाते. पण या परंपरेमागे नेमका काय इतिहास आहे? पौराणिक सत्य काय आहे? आणि आज आपण जे करतोय ती खरोखरच मूळ परंपरा आहे की नंतर सुरू झालेला केवळ एक देखावा ? यावर गंभीरपणे विचार करण्याची कधीही कोणालाही आवश्यकता का भासली नाही ? रावणाच्या संदर्भातील अश्याच अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे आज खरोखरच गरजेचे झाले आहे. आज व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयात अनेक क्षेत्रांसोबतच धर्म व कर्मकांड याबाबत परस्परविरोधी भूमिका घेऊन वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली गेली. दिली जात आहे. अशा विरोधाभासी वातावरणात आज रोज वर्तमानपत्रात चिमुरड्यांवर होणाऱ्या अत्याचाराचे मूक साक्षीदार समाज ज्या पद्धतीने रावणाचा पुतळा जाळून स्वतःचा उदोउदो करतो, ती विकृत मानसिकता आहे.असं म्हटले तर वावगे ठरणार नाही ना !

आम्ही रावणापेक्षा श्रेष्ठ आहोत असा आव आणणाऱ्या समाजाने हे लक्षात ठेवावे की, रावणाचा मृतदेहाला सन्मानाने अग्नी देणारे प्रभू श्रीराम होते. जर आपण स्वतःला रामभक्त म्हणवतो, तर दरवर्षी पुतळे जाळून कसला आनंद साजरा करतोय ? स्वतःच्या मनातील भ्रष्टाचार, वासना, आणि जातीवादाचा रावण जिवंत ठेवून, चौकात कागदाचा रावण जाळणे ही सनातन संस्कृती नव्हे, तर तो संस्कृतीचा पराभव आहे !

पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भांनुसार, लंकाधिपती रावणाचा वध श्रीरामांनी केला हे सत्य आहे.परंतु, रामायणात कुठेही रावणाचा मृतदेह जाळण्यात आला किंवा त्याचा अपमान करण्यात आला, असा उल्लेख नाही. रामायणातील युद्ध समाप्तीनंतर, प्रभू श्रीरामांनी रावणाचा भाऊ विभीषण याला रावणाच्या मृतदेहावर शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची आज्ञा दिली.

  • प्रभू श्रीरामांचे थोर विचार: सुरुवातीला विभीषण आपल्या अधर्मी भावाचे अंत्यसंस्कार करण्यास नकार देत होता. तेव्हा प्रभू श्रीरामांनी त्याला समजावत म्हटले होते:“मरणांतानि वैराणि निर्वृत्तं नः प्रयोजनम्। क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव॥”. अर्थात, “मरणानंतर वैर संपते. आमचा हेतू पूर्ण झाला आहे. हा जितका तुझा भाऊ होता, तितकाच आता माझाही भाऊ आहे. त्यामुळे याचे अंत्यसंस्कार पूर्ण कर.” रावणाच्या अंत्यसंस्कारावेळी प्रभू रामचंद्र तिथे सन्मानाने उपस्थित होते. रावणाचे अंतिम संस्कार लंका नगरीत संपूर्ण राजेशाही आणि वैदिक परंपरेने पार पडले होते.
  • ज्या श्रीरामांनी शत्रूच्या मृतदेहाचा इतका सन्मान केला, त्यांच्याच नावावर आज दरवर्षी रावणाचा पुतळा बनवून तो जाळणे आणि त्यावर अश्लील ओरडणे, हा प्रभू श्रीरामांच्या विचारांचाच अपमान नाही का?
  • आपल्या रक्ताने देवादी देव महादेवाचा अभिषेक करणारा परमभक्त, शिव तांडव स्तोत्राचा रचयिता, चार वेद आणि सहा शास्त्रांचा महाज्ञानी, महान पंडित, प्रचुर विद्वत्ता, बुध्दीमान, नैतिकतेचा आदर्श ( सीतेचे अपहरण केले पण संमतीशिवाय स्पर्श केला नाही) अशा सर्वश्रेष्ठ गुणांचा दशानन, रावण आजही एकमेव व्यक्ती आहे, ज्याला सर्व शास्त्रांसोबत सर्व शस्त्रांचा अगाध ज्ञानाची जोड होती. परंतु विवेकाचा अभाव, देवाचा केवळ नावापुरता वापर करणारा स्वार्थी आणि अहंकार यामुळेच त्याचा नाश झाला. तर आज दररोज वर्तमानपत्रात चिमुरड्यांवर होणाऱ्या अत्याचाराचे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर होणारा अन्याय, मुक साक्षीदार समाज ज्या पद्धतीने रावणाचा पुतळा जाळून स्वतःचा उदोउदो करतो, ती विकृत मानसिकता आहे.असं म्हटले तर वावगे ठरणार !
  • आज रावण दहन करणाऱ्या गर्दीला असे वाटते की, रावण जाळला म्हणजे आम्ही खूप पवित्र, श्रेष्ठ झालो. पण हे स्वतःलाच फसवण्या सारखे आहे. रावणाच्या वधानंतर हजारो वर्षे अशी कोणतीही ‘पुतळा दहन’ करण्याची प्रथा नव्हती. मग ही विकृती किंवा परंपरा कधी सुरू झाली?
  • मध्ययुगीन काळातील सुरुवात: इतिहासकारांच्या मते, रावण दहनाची प्रथा मध्ययुगात (साधारण १४ व्या ते १६ व्या शतकात) सुरू झाली. गोस्वामी तुलसीदासांनी जेव्हा ‘रामचरितमानस’ लिहिले, त्यानंतर उत्तर भारतात ‘रामलीला’ नाटकां द्वारे सादर करण्याची प्रथा लोकप्रिय झाली. रामलीलेचा शेवट लोकांमध्ये मनोरंजकता आणि भव्यता आणण्यासाठी रावणाचा कापडी किंवा गवताचा पुतळा बनवून तो जाळण्याने होऊ लागला. जे केवळ एका नाटकाचा भाग होते, त्याला लोकांनी हळूहळू ‘धार्मिक परंपरा’ बनवून टाकले.
  • सनातनी मानसिकता की राजकीय शोध ?: मूळ सनातन धर्मात (वेदांमध्ये किंवा वाल्मिकी रामायणात) पुतळे जाळण्याची कोणतीही आज्ञा नाही. हा नंतरच्या काळातील काही विशिष्ट वर्गाचा स्वतःला ‘श्रेष्ठ’ दाखवण्याचा आणि सवंग मनोरंजनाचा शोध आहे.महत्वाचे की रावण दहनाची परंपरा सनातन धर्माची मूळ गाभा परंपरा नसून, तो काळाच्या ओघात निर्माण झालेला केवळ एक प्रतिकात्मक देखावा आणि मनोरंजनाचा भाग आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular