अकोला दिव्य न्यूज : विधानसभा निवडणुकात केरळममधे कॉग्रेसने पुन्हा बहुमत मिळवले. मात्र मुख्यमंत्री पदाचा उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पाडून व्ही.डी. सतिशन यांचे नांव अंतिम होण्यास दहा दिवसाचा कालावधी लागला. यावर अनेक पत्रकार वा राजकीय विचारवंतासह सत्ताधारी भाजपानेही टिका केली आहे.अनेक चँनल्सनी याचाही वापर कॉग्रेसवर तोंडसुख घेण्याची संधी म्हणून केला. पण लोकशाही प्रक्रियेत निव्वळ निवडणुका जिंकणे महत्वाचे नसून विचार विनिमय करून सर्व मतांचा आदर करून एकमत निर्माण करणे देखील महत्वाचे असते. भाजपा पक्षांतर्गत असलेल्या एकाधिकारशाहीचे अप्रुप हल्ली राजकीय विचारवंताना इतके वाटते की, लोकशाही प्रक्रियेला, चर्चा वा विचारविनिमयाला ते दिरंगाई म्हणून हिनवतात.

प्रसिद्धी माध्यमांनी लोकशाही व्यवस्थेतील निर्णय प्रक्रियेच्या एकाधिकारशाही स्वरूपाचा झटपट फॉर्मुला प्रतिष्ठित केला जो त्यांच्या स्वार्थासाठी आहे.न्यूज चॅनल्स यांनी आपला टिआरपी वाढविण्यासाठी ‘ब्रेकिंग न्यूज’, ‘सर्वप्रथम केवळ आमच्याच चॅनलवर’ , ‘सर्वात मोठी ब्रेकींग न्यूज’ अशा स्वरूपात धादांत खोट्या आणि प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढविणा-या, विस्मयकारी बातम्या देऊन उताविळपणा आणि उन्मादाला उत्तेजन दिलेलं आहे. हल्लीच्या हेतुपुर्वक प्रपोगंडाच्या काळात उन्माद आणि उताविळपणा हा आपल्या प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग बनला आहे. एकदा कॉल केल्यावर फोन उचलला नाहीतर पुढच्या 60 सेकंदात चारपाच कॉल करणारे अनेक जण पहायला मिळतात किंवा फोन उचलण्यास वीस सेकंद उशीर झालेलाही कांहींना खपत नाही. अशा वातावरणाचा वापर खास करून न्यूज चँनल्सनी प्रचंड प्रमाणात केला आहे. चँनल्सच्या या उताविळ खेळाचे बळी स्वत:ला बुद्धीवादी समजणारे देखील होत आहेत.
केरळम मधे मुख्यमंत्रीपदाचे तीन प्रमुख दावेदार होते. पहिले व्ही.डी.सतिशन, जे मुख्यमंत्री होणार आहेत. व्ही.डी.सतिशन हे तळागाळातील नेते असून कॉग्रेस पक्ष आणि कॉग्रेसचे सहयोगी पक्ष यातील कार्यकर्त्यावर त्यांचा जबरदस्त प्रभाव आहे. दुसरे नेते के.सी.वेणुगोपाल असून ते कॉग्रेस अंतर्गत केंद्रिय नेतृत्व करतात. पार्टीत संघटन स्तरावर त्यांचा दबदबा आहे शिवाय राष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिमा आहे. तिसरे होते, रमेश चेनीथला जे कॉग्रेस पक्षाचे निष्ठावान असून त्यांचा अनुभव प्रदीर्घ आहे.
चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील सर्व पक्षांचा विचार करता कॉग्रेस पक्षाशिवाय इतर कोणत्याही पक्षात पक्षाशी निष्ठावान असणारे, जनाधार असणारे, अनुभवी असे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोणीही नाहीत. या विधानसभा निवडणुकीनंतर केरळ कॉग्रेस असा एकमेव पक्ष आहे ज्यांच्याकडे पार्टीचे निष्ठावान असणारे तीन उमेदवार आहेत. पक्षांतर्गत लोकशाही निर्णय प्रक्रिया राबविणा-या कॉग्रेसला म्हणूनच निर्णयासाठी वेळ लागला, यावर टिका करण्याचे खरंतर कांहीच कारण नाही.

विधानसभा निवडणुकीनंतर आसाम, बंगाल आणि पॉंडेचरीत भाजपा सत्तेत आली हे खरे पण भाजपाने आपल्या पक्षातील निष्ठावान भाजपा नेत्याला त्या राज्यात मुख्यमंत्री केले काय ? सुबिंधु अधिकारी मुळचे कॉग्रेशी त्यानंतर तृणमुल कॉग्रेस पक्षाचे नेते.भाजपाने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून पुन्हा त्यांना पक्षात घेतले आणि मुख्यमंत्री केले. आसाममधेही हेमंता विस्वा सरमा हे पुर्वीचे कॉग्रेसचे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ते मुख्यमंत्री झाले तर पॉंडेचरीतही एन.रंगास्वामी हे मुळचे भाजपाचे नसून ते कॉग्रेस मधून फुटून निघालेल्या पक्षाचे नेते आहेत! भाजपाच्या केंद्रिय नेतृत्वाने आपल्या पक्षांतर्गत दहशतीच्या जोरावर त्यांना मुख्यमंत्री केले आणि राजकीय विद्वान या कृतीला योग्य ठरवण्यासाठी केरळम मधे कॉग्रेसला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार लवकर निवडता आला म्हणून टिका करतात, हे योग्य नव्हे !
कॉग्रेस वर टिका करणा-या राजकीय विद्वानांना पक्षांतर्गत लोकशाहीचे कोणते मॉडेल योग्य वाटते हा महत्वाचा प्रश्न आहे. पक्षांतर्गत लोकशाही निर्णय प्रक्रियेस वेळ लागतो म्हणून ती चुकीची आणि जीथे हाय कमांड कल्चर मुळे लवकर निर्णय घेतला जातो ते योग्य , या तार्किक असा कांहीही आधार नाही. हे बरोबर आहे की, पक्षात शिस्त असायला हवी पण पक्षांतर्गत चर्चा वा विचारविनिमय न करता शिस्तीच्या आवरणाखाली निर्णय थोपवणे हे कोणत्या लोकशाही मुल्यांत येते ? राजकीय पक्ष म्हणजे कॉर्पोरेट संस्था नाहीत की ज्यांनी हाय कमांडचे निर्णय कांहीही चर्चा न करता आहे तसे स्विकारावे, त्यामुळे केरळम मधे जनाधाराचा आदर करताना कॉग्रेसने पक्षांतर्गत जनाधाराचाही आधार घेत विचारविनिमय करून निर्णय घेतला हे लोकशाहीसाठी योग्य आहे.
महाराष्ट्रात सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देखील कॉग्रेस उद्धव ठाकरे यांना पाठींबा देण्यास दिरंगाई करत असल्याबद्दल अनेक राजकीय विद्वानांनी कॉग्रेसवर टिका केली होती. त्यावेळी
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेतील घडामोडीवर मराठी न्यूज चॅनल्सनी अशाच उताविळ वृत्तीचा वापर करत आपला गल्ला भरण्याचा प्रयत्न केला आणि अनेकांना या खेळात ओढून प्रदुषितही केले. विशेष म्हणजे यासाठी धादांत खोटे वृत्त प्रसारीत केले गेले होते! कारण न्युज चँनल्सला लोकशाही प्रक्रियेशी कांहीही देणेघेणे नसते, ते त्यांच्या मालकांचे आदेश आजवर पाळत आलेले आहेत.
दळणवळण आणि संदेशवहन यांचा वाढलेला वेग आपल्या मनावर प्रचंड परीणाम करणारा झाला आहे.त्यामुळे ‘इस्टंट’, ‘दो मिनट’ ‘ताबडतोब’ , ‘चुटकीमें’, ‘सबसे तेज’ याची आपल्याला जणु एवढी सवयच झाली आहे की दिरंगाई आणि उशीर कशाला म्हणायचे याचेही मापदंडही आपण चुकीच्या आधारावर ठरवले आहेत.याच मानसिकतेचा वापर आजच्या बाजारू युगात खुबीने केला जातो आहे. भविष्यात मानवी गर्भधारणेचा नऊ महिन्याचा कालावधीही कमी कसा करता येईल यांवर संशोधन करणारेही जगात आहेतच!
जनमानसांत झटपट, त्वरीत, दो मिनिटमें या उताविळ वृत्तीची लागण झाल्यामुळेच राजकीय महत्वाकांक्षी कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा ओढा आज भाजपाकडे आहे. कारण समाजात पसरलेल्या उताविळपणाच्या वातावरणामुळे राजकीय महत्वाकांक्षा पुर्ण करण्यास लागणा-या अवधीसाठी संयम राहीलेला नाही. समाजातील अशा वातावरणामुळे तसेच
चँनल्सच्या धादांत खोट्या वृत्ताने आणि ‘सबसे तेज’ वृत्तीने प्रदुषित झालेल्या वातावरणात समोर येणा-या प्रत्येक बाबीचा व घटनेचा संयमाने विचार करणे गरजेचे असताना संयमालाच दुर्गुण समजणे चुकीचे आहे.
केरळम मधे बहुमत मिळविल्यानंतर कॉग्रेस पक्षाने पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रिया पार पाडून पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचे मत विचारात घेऊन निर्णय घेतला आहे आणि याच प्रक्रियेतून व्ही. डी. सतिशन मुख्यमंत्री होत आहेत हे लोकशाहीसाठी एक सुचिन्ह आहे. कॉग्रेसवर यासाठी टिका करणा-या विद्वानांनी विचार प्रक्रियेतील महत्वाचा घटक म्हणजे संयम शिकण्याची गरज आहे.
