अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : श्रावण महिन्यात अकोला शहरातील कावड यात्रा विदर्भातील सर्वात मोठी धार्मिक यात्रा असून हजारो शिवभक्त अनवाणी पायी ही यात्रा पूर्ण करतात. हा प्रवास करताना थकवा, निर्जलीकरण, रक्तदाब, उष्माघात, पायांना जखमा तसेच इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवत असतात. अशा परिस्थितीत भाविकांना तातडीने मोफत वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘आपला दवाखाना’ उपक्रमासाठी अकोला जिल्हा परिषदेने २ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.या निर्णयामुळे हजारो शिवभक्तांना मोठा दिलासा मिळणार.

अकोला जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने १५ जुलै २०२६ रोजी दिलेल्या अधिकृत पत्रानुसार, गांधीग्राम येथील कावड यात्रेकरूंच्या आरोग्य सेवेसाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात २ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त खर्चही जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे गटनेते, नगरसेवक व अकोला पूर्व अध्यक्ष निलेश देव यांच्या ६ वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
सहा वर्षांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा : कावड यात्रेदरम्यान दरवर्षी हजारो भाविकांची गैरसोय होत असल्याचे लक्षात घेऊन निलेश देव यांनी सहा वर्षांपूर्वी ‘आपला दवाखाना’ हा उपक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. सुरुवातीला स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि डॉक्टरांच्या सहकार्याने हा उपक्रम उभारण्यात आला. मात्र, वाढती भाविकांची संख्या आणि आरोग्य सेवांची आवश्यकता लक्षात घेता हा उपक्रम अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी सातत्याने जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला. निवेदने, बैठका आणि पत्रव्यवहारानंतर अखेर जिल्हा परिषदेकडून या उपक्रमासाठी अधिकृत निधी मंजूर करण्यात आल्याने समाजसेवेच्या या कार्याला मोठे बळ मिळाले आहे.
‘आपला दवाखाना’ पुन्हा भाविकांच्या सेवेत
श्रावण सोमवार, दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या गांधीग्राम ते अकोला कावड यात्रेदरम्यान ‘आपला दवाखाना’ उपक्रम पुन्हा एकदा भाविकांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहे.या उपक्रमांतर्गत कावड मार्गावर १० ठिकाणी रुग्णवाहिक, तात्पुरती आरोग्य तपासणी केंद्रे,अनुभवी डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी,प्रशिक्षित स्वयंसेवक, आवश्यक औषधे व प्राथमिक उपचार, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे यात्रेदरम्यान कोणत्याही भाविकाची प्रकृती अचानक बिघडल्यास त्याला तातडीने उपचार मिळू शकतील.

शिवभक्तांची सेवा हीच आमची जबाबदारी. कावड यात्रा ही लाखो भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. या यात्रेत सहभागी होणारा प्रत्येक शिवभक्त सुरक्षितपणे आपली यात्रा पूर्ण करून घरी परतावा, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. गेल्या सहा वर्षांपासून ‘आपला दवाखाना’ उपक्रमासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. आज जिल्हा परिषदेकडून निधी मंजूर झाल्यामुळे अधिक व्यापक स्वरूपात आरोग्य सेवा देता येणार आहे. समाजसेवा हीच आमची खरी ताकद असून भाविकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
आभारांची भावना. : या उपक्रमासाठी सातत्याने सहकार्य करणारे अँड. बाळासाहेब आंबेडकर, प्रा. अंजली आंबेडकर, जिल्हा परिषद अकोला, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, डॉक्टर, परिचारिका तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते व प्रशासनाचे निलेश देव यांनी आभार मानले.
