गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : तत्कालीन मध्यप्रांताच्या वृत्तपत्रसृष्टीचे आद्य पत्रकार महर्षी आणि मध्यप्रांताचे पहिलं वृत्तपत्र ‘व-हाड समाचार’ चे मालक, संपादक स्व. खंडेराव बालाजी फडके आणि मातृभुमिकार ब्रजलालजी बियाणी यांच्या ध्येयवादी पत्रकारितेची परंपरा जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या कुवतीप्रमाणे आजवर केला. किती यशस्वी झालो, हे माहित नाही. मात्र मागे वळून पाहतांना, विहंगावलोकन करतांना संपूर्ण समाधानी आहे.

समृद्ध पत्रकारीतेची परंपरा जोपासण्याचा मनस्वी आनंद असताना अनपेक्षित असं करोना संकट कोसळले.सगळं जग सैरभैर झाले होते. करोनाने क्षणात होत्याचं नव्हतं, होऊ लागले. अत्यंत बिकट अवस्था झाली असताना गौतम बुद्धांचं बोधवाक्य चैरवेती.. चैरवेती… अर्थात चालत रहा…. चालत रहा या बोधवाक्यानं नवं बळ आलं. जीवनाची सुरुवात नव्याने करीत पुढे चालत रहायचे. थांबायचे नसते, म्हणून काळानुरूप ९ सप्टेंबर २०२० रोजी ‘अकोला दिव्य’ नावाने मराठी न्यूज वेबसाइट रुजू करून माध्यमातील ‘ऑनलाइन’ या नवीन माध्यमात पदार्पण केले.

दैनिक मातृभूमिमधील ३२ वर्षांचा प्रदिर्घ प्रवास मी थांबविला आहे, हे माहीत होतांच शेकडोजणांनी व्यक्त केलेल्या भावभावनांमुळे माझा इतरांवर असलेला विश्वास अधिक अतुट झाला.तर कालानुरुप वृत्तपत्र क्षेत्रातील कार्यपद्धतीत होऊ लागलेले बदल तर लक्षात येत होते. तेव्हा आपणही या बदलत्या पत्रकारितेच अंग का होऊ नये? हा विचार मनात आला आणि असंख्य मित्र, हितचिंतक, साहित्यीक, कलावंत, लेखक, व्यावसायीक आणि निस्वार्थ मार्गदर्शकांसोबत विचारविनिमय करून, त्यांच्या पाठबळावर अकोला दिव्य न्यूज वेबसाइट सुरू केली.

बघता बघता आज ६ व्या वर्ष प्रवेशाला मन भरून आले आहे. आजवरच्या आयुष्यात मी खोटारडेपणाच्या डोंगरावर चढलेल्या अनेक लोकांना तेथून खाली घरंगळतांना बघीतले आहे. मात्र आज माध्यमांमध्ये आपले नियत कर्तव्य सोडून कमरेचे सोडून डोक्यावर बांधण्याची स्पर्धा बघून वेदना होतात. सध्या राजकीय क्षेत्रात जे काही सुरु आहे. ते पाहता नेत्यांना कशाचे राजकारण करावयाचे आहे. हे कळत नाही. एकवेळ राजकारण्यांचे समजून घेता येईल. मात्र लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यमांची (काही अपवाद वगळता) नेमकी भूमिका कोणती ?

अलिकडच्या वर्षात विविध माध्यमांमध्ये जे काही सुरु आहे.ते बघून किळस येते. किमान विचार करण्याची क्षमता असलेल्यांना मनस्वी चीड, उद्विग्न, हतबुद्ध व नैराश्य आणणारे आहे.आता लोकं उघडपणे व्यक्त होतं आहेत. अनेक महत्वाच्या प्रश्नांवर, समस्यांवर साधक बाधक चर्चा होणे. त्यातून ठोस उपाय योजनांचे नियोजन समोर येणे गरजेचे असतांना माध्यमांमध्ये वेगळ्याच विषयांवर चर्चा का करतायंत.माध्यमांमध्ये पंतप्रधान म्हणजेच देश, देशभक्ती आणि धर्म आहे.असं का बिंबवले जाते ? एकापेक्षा एक अर्थहीन प्रश्न करून आपण काय चर्चा करुन घेत आहोत ? याचे देखील भान का नाही. हे कशाचे लक्षण समजावे ?

या मुद्यावर मी अनेक वेळा स्वतःशी संघर्ष केला आहे. या मुद्यावर भविष्यात देखील अनेकदा, स्वतः सोबत संघर्ष करावा लागणार आहे आणि यासाठी मी मानसिकदृष्ट्या कणखर आहे. भविष्याची माहिती नाही पण खारीचा वाटा उचलल्याचे मात्र समाधान नेहमी राहणार आहे. हे निश्चित! मी पूर्णपणे आशावादी आहे. अनुभवाचा वेष घातलेला एक गुरु आयुष्यानं दिलेलाच आहे. तो गुरु प्रगल्भतेत भर घालणाराचं आहे. माझी सजगता त्या अनुभवातून मला प्रगल्भ होण्यासाठी, संघर्षशील राहण्यासाठी केवळ सहाय्य करीत नाहीत. तर मला माझ्या मनाचा तोल सावरण्यासाठी मदत ही करते.

आपली प्रतिष्ठापणाला लावून मी कधीही, कोणतेही काम केले नाही. प्रतिष्ठा व पदे घेवून स्वतःला मिरवून घेण्याची हौस कधीच केली नाही. कदाचित माझ्यामधे ती कुवत नसावी.पण मी तत्वाशी तडतोड केली नाही. मी माझा सन्मान आणि प्रामाणिकपणाचे जोरकसपणे रक्षण केले आहे. मात्र, इतरांचा विश्वासही कायम जोपासण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. फटकळपणा, आत्मविश्वास व जास्त विचार न करता उडी मारणे हे इतरांना माझे दुर्गुण वाटत असावे. परंतु माझ्या मते हे दुर्गुण नव्हे तर, संघर्षशील व संयमीत जीवन जगण्याचे सुत्र आहे.

एकमात्र खरे की, फटकळपणाची एक किंमत चुकती करावी लागते आणि कोणताही पश्चाताप व्यक्त न करता मी हे कबुल करतो की, ही किंमत मी अनेक वेळा चुकविली आहे. परंतु ही किंमत चुकती केल्याचा कुठलाही क्लेश माझ्या मनात नाही. अकोला शहरातील पत्रकारितेच्या क्षेत्रात वाणिज्य प्रतिनिधी, पत्रकार, उपसंपादक, वृत्तसंपादक ते निवासी संपादक या पदावर कार्यरत राहताना, सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद व सहकार्य दिल्याने ३२ वर्ष कधी झालीत. हे कळलंच नाही. आता मालक संपादक असलेल्या ‘अकोला दिव्य’ (न्यूज वेबसाइट) चा ५ वर्षाचा प्रवास लिलया पूर्ण झाला.

विशेष म्हणजे ५ वर्षात १७ लाखांच्यावर व्हिजीर्टस आणि ४० लाखांच्यावर विव्हर्सचा टप्पा पार केला आहे. हे वाचकांचा विश्वासाचं प्रतीक आहे. सर्वाधिक वाचक असलेली ‘अकोला दिव्य’ ही अकोला शहरातील पहिली मराठी न्यूज वेबसाइट आहे. आकड्यांच्या फुटपट्टी वर या ५ वर्षांच्या यशाचं मोजमाप केलं तर, शेकडो लोकांच्या सहृद्यातुन ते लख्ख झळकतयं ! यांचं विश्वासाने असेच अनेक टप्पे गाठता येईल, यामध्ये मुळींच शंका नाही

माझ्यातील गुण-दोषांसह सर्वांनी मला आपलं केलं आहे. या बाबींचा कृतज्ञतापूर्वक स्मरण करून पुनश्च एकदा त्रिवार वंदन अन् भावपूर्ण अभिवादन ! हीच कृतज्ञता सदैव लक्षात घेऊन, कुणाच्याही विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेत, असेच अनेक टप्पे गाठता येईल, यामध्ये मुळींच शंका नाही. कारण एकच की, .. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती…….

