Home1925 मधील अकोल्याची Gen X म्हणजे 'वाघिण' दुर्गाबाई जोशी ! ऐतिहासिक...

1925 मधील अकोल्याची Gen X म्हणजे ‘वाघिण’ दुर्गाबाई जोशी ! ऐतिहासिक इतिहास समजून घ्या

अकोला दिव्य : गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : आज देशात स्वकीयांची सत्ता असताना, निसर्गदत्त व घटनात्मक हक्क, अधिकार आणि मुलभूत सुविधांवर घाला घातल्या जात आहे. लाखो तरुणी या विरोधात आंदोलनात उतरल्यावर नाना प्रकारे त्यांना ट्रोल केले जात आहे. ट्रोल का नवा शब्द वापरला जात असला तरी, हे काही नवीन नाही. देशात हेच सुरू आहे. तरुणी व स्त्रीयांच्या बाबतीत म्हणावे तर हजारो वर्षांपासून भारतीय स्त्रियांना ‘चुल आणि मुल’ व तरुणींना सामाजिक बंधनांचा परिघात बांधून, पुरुषसत्ताकांकडून सुरू असलेल्या अमानवीय छळातून पिडीतांची इंग्रजांच्या राजवटीत अनेक अनिष्ट रूढी प्रथा व परंपरापासून मुक्त होण्याला सुरुवात झाली. हे सत्य नाकारता येत नाही. असो !

संग्रहित छायाचित्र

हे सत्य असलं तरी जेव्हा, देशाचं सार्वभौमत्व व देशवासियांचे हक्क व अधिकाराचा मुद्दा आला.तेव्हा इंग्रजांच्या व्यवस्थेविरुद्ध शहर व गाव खेड्यातून सर्वंच समाजातील तळागाळातील, साक्षर व निरक्षर लाखों तरूणी व महिलांनी घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली. तात्पर्य एवढेच की, सत्तेचा अहंकारातून जेव्हा अधिकार व हक्काचे दमन होऊ लागले. तेव्हा झालेल्या मुक्तता पेक्षा अत्याचार विरोधात रस्त्यावर येणे काळाची गरज होती. तेव्हा देखील क्रांतिकारी सनातनी मानसिकतेची टिंगलटवाळी, दोषारोपण, दडपण तिरस्कार, बहिष्कृत असं सर्व काही तरुणी व स्त्रीयांना सहन करावे लागले. मात्र आपल्या उद्देशाने डगमगल्या नाही. तर उलट आपल्या नावाने इतिहास रचत ‘त्या’ स्वतंत्र भारताच्या इतिहास अजरामर आहेतः

संपुर्ण देशांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील अकोला शहर आणि जिल्ह्यात स्वातंत्र्य चळवळीत हजारो स्त्रिया सक्रिय सहभागी झाल्या होत्या. काहींना चक्क कारावास भोगावा लागला. पण स्त्रिया मागे हटल्या नाही. तर दुप्पट जोमाने सत्तेविरुद्ध जहाल लढा दिला. इंग्रजांच्या राजवटीतून देशाला मुक्त करण्यासाठी, सर्वसामान्य लोकांना हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी शेकडो तरुणी व स्त्रीयांनी इंकलाब जिंदाबाद, वंदे मातरम् नारा बुलंद केला. देशात १९३० मध्ये महात्मा गांधींनी पुकारलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान अकोला येथे २१ एप्रिल १९३० रोजी अकोल्यातील टिळक मैदानावर (आजचे भाटे क्लब) दुर्गाबाई जोशी यांनी स्थानिक महिलांच्या गटाचे नेतृत्व केले. मैदानात मिठ तयार करून, ब्रिटीश सरकारच्या मिठाच्या कायद्याला थेट आव्हान देत कायदेभंग केला.

Oplus_131072

१९३२ च्या विदर्भातील प्रसिद्ध जंगल सत्याग्रहाचे दुर्गाबाई जोशी यांनी नेतृत्व केले. यावेळी आंदोलनात त्यांच्यासोबत सावित्रीबाई बियाणी, रमाबाई चौधरी, सिताबाई इंगळे,गंगूताई बापट, राधाबाई ओक, रमाबाई केळकर, ताराबाई मश्रूवाला, मनुताई कोल्हटकर, मयूराबाई आपटे,कमलाबाई भागवत, राधाबाई भाटीया, सीताबाई मुंडे, वत्सलाबाई प्रधान,चंपूबाई बनसोड, गोपाबाई अग्रवाल, यमुनाबाई ताकवाले, सरस्वतीबाई मेहरे, प्रमिलाताई ओक यांच्यासह शेकडो महिला खांद्याला खांदा लावून लढल्या. यावेळी दुर्गाबाई जोशी या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य नेत्या, समाजसुधारक आणि राजकीय कार्यकर्त्या होत्या. त्यांनी अकोला जिल्ह्यात महिलांना संघटित करून राष्ट्रीय चळवळीत मोठे योगदान दिले.

महिलांचे प्रबोधन: अकोला व अमरावती परिसरातील शहरी आणि ग्रामीण महिलांना दुर्गाबाई जोशी यांनी चूल आणि मूल यातून बाहेर काढून काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीत व निधी संकलनात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. स्वातंत्र्य लढ्यात इंग्रज अधिकाऱ्यांवर चवताळून जाण्याचा आक्रमक पवित्रा असल्याने दुर्गाबाई जोशी यांना ‘वाघिण’ म्हटले जात. तत्कालीन वऱ्हाड (Berar) प्रांतातील अकोला मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार म्हणून दुर्गाबाई जोशी निवडून आल्या होत्या.

  • १९३८ मध्ये पक्षांतर्गत राजकारणावर व प्रांतीय सरकारमधील भेदभावावर थेट सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे पत्र लिहून आक्षेप नोंदवले होते, ज्यामुळे त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि राजकीय समज दिसून येते. प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी वीर वामनराव जोशी यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांनी १९४१ मध्ये आपल्या पतीच्या जीवनप्रवासावर ‘आमचे वीर वामनराव जोशी’ या नावाचे चरित्रपर पुस्तक लिहून प्रकाशित केले होते.
  • अकोला येथील राष्ट्रीय महिला मंडळ ही एक अत्यंत महत्त्वाची पक्षभेदरहित सामाजिक संस्था होती.या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे यात समाजातील उच्च किंवा मध्यमवर्गीय स्त्रियांपुरते मर्यादित न राहता सर्व स्तरांतील स्त्रियांना सदस्यत्व दिले गेले होते. दुर्गाबाई जोशी आणि त्यांच्या समकालीन महिला कार्यकर्त्यांनी या मंडळाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण आणि लहान मुलांसाठी बालक मंदिरांची (अंगणवाडी/बालवाडी) स्थापना केली. या बालक मंदिराच्या उत्कर्षासाठी बसंतीबाई झंवर यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केले होते.

देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात देशात महिला आणि बाल कल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर संस्थात्मक व सामुदायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यात आले होते. दुर्गाबाई जोशी यांचा या संदर्भातील ऐतिहासिक इतिहास खालील मुद्द्यांद्वारे समजून घेता येईल.

महिला घटक योजना (Women Component Plan): भारताच्या आर्थिक नियोजनात महिलांचा सहभाग आणि त्यांच्या विकासासाठी ऐतिहासिक दृष्ट्या दुर्गाबाई जोशी, सरोजिनी नायडू, आणि विजयलक्ष्मी पंडित यांसारख्या प्रमुख महिला नेत्यांच्या योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख केला जातो. त्यांनी अकोला आणि वऱ्हाड (बेरार) भागात ‘हरिजन सेवक संघ’ व अनाथ-महिलांच्या उन्नतीसाठी विविध संस्थात्मक कामे केली. दुर्गाबाई जोशी यांची एकूण कार्यक्षमता, आक्रमकता समजून घेताना, त्याकाळातील जातीभेदाच्या पलिकडे जाऊन त्यांनी हरिजन सेवक संघ स्थापन केला म्हणजे त्याही त्यावेळच्या Gen Z होत्या. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ना!

१३ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध झालेल्या आज इतवार या सदरातून साभार

(दुर्गाबाई जोशी यांनी केलेल्या पत्रव्यवहारातील काही कागदपत्रे अकोला दिव्य कडे सांभाळून आहे. हा अमूल्य ठेवा आहे.)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular