अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : Akola Rain : महाराष्ट्रात मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पश्चिम विदर्भासह अकोला शहर व जिल्हा जलमय झाला असून यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील हजारों हेक्टर शेतजमीन पाण्यात गेली आहे. मोठ्याप्रमाणात पेरण्या होऊन पिकांचे कोंब फुटलेल्या शेतात सर्वत्र पाणी साचले. तेव्हा दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागातील घरात पाणी शिरलं आहे. विशेषतः जुने अकोल्यातील शेकडो लोकांच्या घरातही पाणी शिरलं आहे.अनेकांच्या घरातील साहित्य तसेच इतर वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे शहरातील जवळपास सर्वच रस्ते जलमय झाले आहेत. मोठे नाले आणि नाल्याची साफसफाई नसल्याने पाण्याचा निचरा होणारी व्यवस्थाच नसल्याने लोकांच्या अडचणीत वाढ होत आहे. मान्सून पुर्व नाले-नाली सफाई कशी होतेय, हे दरवर्षी पावसाकडून उघडकीस आणले जाते. तरीही दरवर्षी ही दुरावस्था कायमच राहते.

शहरातील मोठी उमरी ते गुडधी रस्त्याला अक्षरशः नदीचं रूप आलं आहे. दरम्यान, बातमी लिहितं असताना सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे.अकोल्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. तर ग्रामीण भागातील वाहतुकीवर देखील याचा परिणाम झाला आहे.अनेक ठिकाणी यामुळं वाहतुकीची कोंडी झाली होती.अनेक वाहनधारकांना वाहने काढताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. काल गुरुवारी रात्री शहरात अनेकांची वाहने पाण्यामुळे रस्त्यातच बंद पडल्यानं अडकून पडली होती.

अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्य तसेच इतर वस्तूंचं मोठं नुकसान झालं आहे. गोरेगाव बुद्रुक गावातील बंशा नाल्याला पूर आल्याने गावाचा जिल्हा मुख्यालयासोबतचा संपर्क तुटलाय. नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा जिल्हा प्रशासनानं इशारा दिला आहे. सध्या पाऊसाचा वेग अत्यंत कमी झाल्याने वसाहतीत पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.

राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
राज्याच्या विविध भागासोबतच पश्चिम विदर्भातील अकोला,वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांतही पाऊसाचा दमदार हजेरीने नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. बहुतांश ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सगळ्याच धरणांच्या पाण्याच्या साठ्यात देखील वाढ झाली आहे. लहान प्रकल्प व कालवे आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. . दरम्यान आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, जालना, औरंगाबाद, लातूर बीड या जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.