अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : विदर्भात पहिल्यांदाच भारतीय जीवनमूल्ये, कृषी संस्कृती आणि नैसर्गिक आरोग्य उपचार असा त्रिवेणी संगम अकोल्यात साकारले गेले असून ‘पद्मालय वेलनेस आयुर्वेद व निसर्गोपचार’ आणि ‘आग्रोन कृषी पर्यटन केंद्र’ची येत्या १ ऑगस्टपासून विदर्भवासीयांच्या सेवेत रुजवात होत आहे.केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याप्रसंगी रामायणाचार्य व गोसेवक संजय महाराज पाचपोर आणि भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांची विशेष उपस्थिती लाभली आहे.याशिवाय विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती लाभणार आहे.अशी माहिती या प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ.मनोज अग्रवाल यांनी दिली.

या प्रकल्पाच्या मागील भुमिका आणि आवश्यकता स्पष्ट करताना डॉ.अग्रवाल म्हणाले की, आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये बदलत चाललेली आहारपद्धत, व्यायामाचा अभाव आणि निसर्गापासून वाढत्या अंतराने विविध शारीरिक व मानसिक आजार ही वास्तविकता नाकारता येत नाही. , गाव, शेती, संस्कृती, ऋतुचक्र, नैसर्गिक जीवनपद्धती, पारंपरिक आरोग्य विज्ञानाशी असलेले नाते कमी होत आहे. केवळ रोगांवर उपचार करणाऱ्या आरोग्यसेवा नव्हे, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा आणि जीवनशैलीचा विचार करणाऱ्या समग्र आरोग्य व्यवस्थेची गरज निर्माण झाली आहे. याच विचाराने अकोला येथे ‘पद्मालय वेलनेस आयुर्वेद व निसर्गोपचार’ आणि ‘अँग्रोन कृषी पर्यटन केंद्र’ या दोन महत्त्वपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रमांची निर्मिती करण्यात आली आहे.

सामाजिक बांधिलकीतून साकार झालेल्या या दोन्ही उपक्रमांच्या मागे केवळ व्यावसायिक दृष्टीकोन नसून पद्मालय वेलनेस आयुर्वेद व निसर्गोपचारचे फाउंडर डायरेक्टर डॉ. मनोज अग्रवाल यांनी भारतीय पारंपरिक आरोग्यशास्त्र, आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी आरोग्याच्या समग्र संकल्पनेचा अभ्यासपूर्वक विचार करून या प्रकल्पाची उभारणी केली आहे. या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. सौ. वर्षा अग्रवाल या संस्थेच्या विविध आरोग्य व वेलनेस उपक्रमांचे नियोजन, व्यवस्थापन आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहेत.असे निसर्गोपचार आणि वैकल्पिक चिकित्सक डॉ.आदित्य पुंड यांनी सांगितले.

‘आरोग्य’ या संकल्पनेचा अर्थ केवळ रोग नसणे एवढाच मर्यादित राहिलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याला महत्त्व दिले असून नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वसलेले पद्मालय वेलनेस सेंटर हे केवळ उपचार केंद्र नसून ‘आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अनुभव देणारे केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. येथे येणाऱ्या व्यक्तीचा केवळ रुग्ण म्हणून नाही तर संपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून विकास केला जाणार आहे. व्यक्तीची प्रकृती, जीवनशैली, आहार, मानसिक अवस्था, दैनंदिन सवयी आणि आरोग्यविषयक गरजा यांचा अभ्यास करून त्यानुसार वैयक्तिक स्वरुपातील आरोग्य आणि वेलनेस योजना तयार करण्यात येतात.

या केंद्रामध्ये योग चिकित्सा,आयुर्वेद, पंचकर्म, निसर्गोपचार, आहार चिकित्सा, जल चिकित्सा, कोलोन हायड्रोथेरपी, मॅग्नेटोथेरपी, अग्निकर्म, विध्दकर्म यासह चाळीसपेक्षाअधिक आरोग्य व वेलनेस सेवा उपलब्ध राहणार आहेत. शरीराची नैसर्गिक उपचार क्षमता जागृत करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, शरीरशुद्धी, तणाव व्यवस्थापन, आरोग्य संवर्धन, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि संतुलित जीवनशैली निर्माण करणे ही या सर्व उपचारपद्धतींची मूलभूत उद्दिष्टे असल्याचे डॉ. पुंड यांनी सांगितले
निसर्गोपचार तज्ज्ञ, योग विशेषज्ञ व वेलनेस प्रोफेशनल्सची टीम उपचार प्रदान करणार आहे . यासोबतच सात्विक, पौष्टिक आणि चिकित्सकीय दृष्टिकोनातून आरोग्यवर्धक आहाराची व्यवस्था राहणार आहे. शरीराच्या आवश्यकतेनुसार आहाराचे नियोजन, डिटॉक्स कार्यक्रम, पंचकर्म उपचार, योग व ध्यान साधना, निवासी वेलनेस कार्यक्रम व समय आरोग्यविषयक उपक्रमांची सुविधाही उपलब्ध आहे.पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र उपचार विभाग, प्रशस्त योग आणि ध्यान हॉल, डिलक्स निवासी सुविधा, हरित उद्याने आणि शांत आध्यात्मिक वातावरण या सर्व सुविधा आरोग्यपूर्ण जीवनाचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी सहाय्यक ठरणार, असे डॉ.अग्रवाल व डॉ.पुंड यांनी सांगितले.
