अकोला शिंदेसेना नेत्याचा मृत्यू अपघाती नाही ? कुटुंबाचा माजी जिल्हाप्रमुखावर हत्येचा आरोप

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : शिंदे सेनेचे अल्पसंख्याक आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष शेख  मोहसिन शेख समद यांच्या अपघातातील मृत्यूला आता धक्कादायक वळण लागले आहे. शेख मोहसिन शेख समद यांचा २३ जुलै रोजी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. आता त्यांच्या कुटुंबीयांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करत शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनी शेख मोहसिन शेख समद यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. तसेच मंगेश काळे यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई करावी या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार २३ जुलै २०२६ रोजी अकोल्यातील  नेहरू पार्क परिसरात दुचाकीला चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिंदेसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसिन शेख समद हे गंभीर जखमी झाले होते. पुढे रुग्णालयात उपचारांदरम्यान  त्यांचा मृत्यू झाला होता. पण आता हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय शेख मोहसिन शेख समद यांच्या कुटुंबीयांनी घेतला असून, शिंदेसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्या कारने धडक देऊन ही हत्या घडवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी मंगेश काळे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेख मोहसिन शेख समद यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी करत कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यावर धडकही दिली. तसेच मंगेश काळेंवर गुन्हा न दाखल झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here