Saturday, June 27, 2026
No menu items!
No menu items!
Homeसर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील 'टीईटी' परिक्षेचा पेपर फुटला ; उद्याची परिक्षा...

सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘टीईटी’ परिक्षेचा पेपर फुटला ; उद्याची परिक्षा रद्द

MSCE Pune Teacher Eligibility Test cancelled news: अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अलीकडेच झालेल्या नीट २०२६ परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने उद्या, रविवार दि. २८ जून २०२६ रोजी संपूर्ण राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेसाठी यंदा चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. मात्र, परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधीच पेपर फुटीचा गैरप्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे उद्या, रविवार दि. २८ जून २०२६ रोजी आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ तडकाफडकी पुढे ढकलण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. २७ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास भिवंडी पोलिसांना एका गुप्त माहितीदाराकडून अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती. भिवंडीतील काही इसमांकडे आगामी टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबतची माहिती आणि साहित्य असल्याची खात्री पटताच भिवंडी पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकला.

प्रश्न जुळल्याने गुन्हा दाखल
धाड टाकल्यानंतर पोलिसांनी सखोल तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकार्‍यांना तातडीने घटनास्थळी पाचारण केले. अधिकार्‍यांनी घटनास्थळी जप्त करण्यात आलेल्या साहित्याची आणि मूळ प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली असता, संशयित इसमांकडे सापडलेले काही प्रश्न प्रत्यक्ष टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळत असल्याचे आढळून आले. प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे स्पष्ट होताच भिवंडी पोलीस ठाण्यात संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परीक्षा कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शकतेने पार पडली पाहिजे हाच परीक्षा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याने उद्या २८ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे,” अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
अचानक परीक्षा रद्द झाल्यामुळे लाखो उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, टीईटी परीक्षेच्या पुढील तारखेबाबतची अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mscepune.in) लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले असून उमेदवारांना अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ मधील कथित पेपरफुटीमुळे हजारो प्रामाणिक शिक्षकांच्या अनेक महिन्यांच्या तन-मन-धनाने केलेल्या परिश्रमांवर पाणी फिरले आहे. शाळेच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी प्रामाणिकपणे तयारी केली; मात्र काही मोजक्या गैरप्रकार करणाऱ्यांमुळे सर्वांनाच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि पात्र उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी नव्या परीक्षेची तारीख तातडीने जाहीर करावी. प्रामाणिक शिक्षकांना न्याय देणे ही शासन व प्रशासनाची नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!