अकोला दिव्य न्यूज • गजानन सोमाणी एडिटर इन चीफ : आज स्वार्थाने बरबटलेल्या वृत्तीने उचल खाल्ली असून बोटांवर मोजता येतील एवढेच अपवाद वगळता अनेक नात्या-गोत्यात ‘ताका पुरत रामायण’ आणि ‘कामा पुरता मामा’ या म्हणीचा प्रत्यय पदोपदी जाणवत आहे. आजच्या नात्या गोत्यासारखंच मालक-कर्मचारी यांचे नातं देखील केवळ काम, वेळ व पगार एवढ्यावरच टिकून आहेत. सगळ काही तकलाद होत चालले असून अशा अत्यंत विदारक होत चाललेल्या समाज व्यवस्थेत अकोला शहरात घडलेला अविस्मरणीय प्रसंग सगळ्यांचा डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. नातं केवळ रक्ताचेच नसते तर अतुट विश्वासाने असं नातं मात्र रक्ताच्या पलिकडे जावून निर्माण होते. समाजाला या रक्ता पलिकडच्या नात्याचा खरा अर्थ तेव्हा उलगडते जेव्हा मृतकाचे केवळ कुटुंब नव्हे, तर ४० वर्षांपासून मालक असलेले कुटुंब शोकमग्न होते.भरलेल्या डोळ्यांनी स्वत:चा कुटुंबातील व्यक्तीचेच निधन झाल्याचे दुःख घेऊन अंतिम संस्काराचा विधी स्वतःच्या हाताने पूर्ण करतात. तेव्हा एकच वाक्य ओठांवर येते की, आता ऐसा ‘बनवारी’ ना होणे !

अकोला शहरात विदर्भ डिपार्टमेंट स्टोअर्सची मुहूर्तमेढ रोवणारे स्व. सुरेश मणियार यांच्या खांद्याला खांदा लावून, सुखदुःखात सहभागी होऊन कुटुंबाचा अविभाज्य अंग होत तब्बल चार दशके म्हणजे शेवटचा श्वासापर्यंत इमानेइतबारे कर्तव्य पार पडणारे बनवारीलाल शर्मा यांच्या निधनाने मणियार कुटुंबात कधीही भरून निघणार नाही अशी पोकळी निर्माण झाली आहे. दरदिवशी, दरवेळी दिलेली जबाबदारी तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि निष्ठेने ती पुर्ण करणारे बनवारीलाल यांनी स्व.सुरेशभाऊंनी टाकलेल्या विश्वासाला अखेरच्या श्वासापर्यंत तडा जाऊ दिला नाही. मणियार कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हृदयात बनवारीलाल शर्मा यांनी आपली एक वेगळी छाप उमटवली होती. कालांतराने हे नातं इतके घट्ट झाले की ते फक्त कर्मचारी राहिले नाही. पंकज व अमित या भावंडानी तर दुकानच बनवारीलाल यांच्या हवाली केले होते. तेच जणू मालक होते आणि हे संबंध कौटुंबिक बंधनात रूपांतरित कधी झाले, कोणालाही कळले नाही. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच, मणियार कुटुंब व नातेवाईक तात्काळ बनवारीलाल यांच्या घरी दाखल झाले. त्यांचा मृतदेह बघता क्षणीच डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. अखेरचा निरोप देताना मणियार कुटुंब ढसाढसा रडले. हे दृश्य पाहून उपस्थितांचे मन हेलावले.

केवळ एक कर्मचारी नव्हे तर कुटुंबातील सदस्य गमावल्याची वेदना होती. बनवारीलाल यांनी आपल्या आयुष्याची चार दशके मणियार कुटुंबाला दिली आणि मणियार कुटुंबियांनीही त्यांना सदैव आदर, सन्मान आणि आपलेपण दिले. आजच्या काळात हे क्वचितच पाहायला मिळते. आज कामाच्या ठिकाणी औपचारिकता व मनामनात दुजभाव वाढत असताना बनवारीलाल शर्मा यांचे समर्पण आणि मणियार कुटुंबाने टाकलेला विश्वास आणि दोन्ही बाजूंनी मनापासून नात्याला अधिक महत्त्व दिले गेल्याने शेवटी एकच की, ऐसा बनवारी पुन्हा होने नाही !
