Saturday, May 9, 2026
No menu items!
No menu items!
Homeसन्मित्र @ 100 टक्के ! 8 वर्षांची यशाची परंपरा कायम

सन्मित्र @ 100 टक्के ! 8 वर्षांची यशाची परंपरा कायम

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सन २०२५-२६ च्या शालांत परीक्षेचा आज निकाल जाहीर झाल्यानंतर बिर्ला कॉलनी येथील सन्मित्र पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सलग आठ वर्षांपासून शाळेने शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा अबाधित ठेवली आहे.

यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्तरावरही उत्कृष्ट यश मिळवले असून मुलींनी पुन्हा गुणवत्ता यादीत आघाडी घेतली आहे. यामध्ये आदिती आशिष गावंडे हिने ९८.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. नील पांडे ९५.८० टक्के गुणांसह द्वितीय, धनश्री देशमुख ९४.६० टक्के गुणांसह तृतीय, श्रवण वक्ते ९१.०० टक्के गुणांसह चौथा तर रिद्धी पवार हिने ८८.४० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला. तसेच आस्था अटकर (८६.६०) अवनी धरमठोक (८५.६०) इशिका देशमुख (७८.८०) कृतिका गावंडे (७०.४०) अथर्व आमले (६७.८०) हितेश भालेराव (६४.६०) यांनी देखील यश संपादन केले.

शाळेतील एकूण ५८ टक्के विद्यार्थी डिस्टिंक्शन श्रेणीत तर असून ४२ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विषयवार गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयात आदिती गावंडे हिने ९५ गुण, मराठी विषयात ९७ गुण, हिंदी-संस्कृत संयुक्त विषयात आदिती गावंडे व धनश्री देशमुख यांनी प्रत्येकी ९६ गुण मिळवले. गणित विषयात नील पांडे याने शंभर पैकी शंभर गुण मिळवून विशेष यश मिळवले, तर विज्ञान विषयात त्याने ९८ गुण प्राप्त केले. सामाजिक शास्त्र विषयात आदिती गावंडे हिने ९५ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालकांनी संस्थेचे, शिक्षकवृंदांचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करत सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. शाळेच्या प्राचार्या सौ. मनीषा राजपूत मॅडम यांच्या कुशल नेतृत्वाखाली वर्षभर राबविण्यात आलेले विविध शैक्षणिक उपक्रम, तीन सराव परीक्षा, वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन यांचा हा यशस्वी परिपाक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सिंह राजपूत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच प्राचार्या राजपूत यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. पुढील काळातही विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये यशाची हीच परंपरा कायम राहावी, अशा शुभेच्छा दिल्या. प्राचार्या मनीषा राजपूत यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!