•अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाला उपक्रमाला आरंभ
अकोला दिव्य न्यूज : विदर्भातील अकोला जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक उष्णतेचा सामना करणाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात तापमान अनेकदा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे जाते. शहरातील वाढते सिमेंट रस्ते, कमी होत चाललेली हरितक्षेत्र आणि बदलती भौगोलिक परिस्थिती यामुळे ‘हीट आयलंड इफेक्ट’ तीव्र होत असून, नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी अकोल्यात एक नाविन्यपूर्ण आणि दूरदृष्टीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

अँड धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पच्या वतीने पुढील पाच वर्षांसाठी वृक्षलागवड, संगोपन व संवर्धनासोबतच निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मितीची योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची एकत्रित पर्यावरणपूरक योजना राबविण्यासाठी अकोला पुढाकार घेत असून, हा उपक्रम राज्यासाठी एक आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त10 मे 2026 पासून या योजनेची नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. इच्छुकांनी पुष्कर अपार्टमेंट, सातव चौक अकोला येथील प्रकल्प कार्यालयात नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या नागरिकांना पावसाळ्यात मोफत वृक्षरोप दिली जाणार आहेत.
या योजनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे निर्माल्य (पूजेनंतर उरलेली फुले व जैविक सामग्री) संकलित करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करून हे खत वृक्षांना दिले जाणार. त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही उद्दिष्टांना साध्य करण्यात येणार आहे. प्रकल्पांतर्गत तयार केलेलं सेंद्रिय खत सहभागी नागरिकांना टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल.
ही योजना केवळ वृक्षलागवड करण्यापुरती मर्यादित नसून, त्या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन यावर विशेष भर देण्यात आला आहे. वृक्ष सेवक म्हणून सहभागी होणाऱ्या नागरिकांना दरवर्षी 500 रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे. सलग पाच वर्षे हे प्रोत्साहन देण्यात येणार असून, एकूण 2500 रुपयांचा वृक्षसंवर्धन निधी दिला जाईल.

वृक्षांचे योग्य संगोपन सुनिश्चित करण्यासाठी दरवर्षी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात येईल. प्रकल्प कार्यकारिणी सदस्य प्रत्येक वृक्ष सेवकाच्या घरी भेट देऊन मार्गदर्शन करतील आणि संगोपनाच्या प्रगतीनुसार विशेष बक्षिसेही दिली जाणार आहेत.
या उपक्रमाबाबत माहिती देताना प्रकल्पाचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे मनपा गटनेते व अकोला पुर्व अध्यक्ष निलेश देव यांनी सांगितले की, अकोल्यातील वाढते तापमान आणि पर्यावरणीय असंतुलन ही गंभीर समस्या बनली आहे. यावर उपाय म्हणून नागरिकांच्या सहभागातून हरितक्रांती घडवणे आवश्यक आहे. निर्माल्यापासून खत तयार करून त्याचा उपयोग वृक्षसंवर्धनासाठी करणे हा एक शाश्वत आणि पर्यावरणपूरक मार्ग आहे.महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अकोला आघाडीवर येत असून, हा ५ वर्षांचा प्रकल्प शहराला अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि पर्यावरणस्नेही बनवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल मानला जात आहे.
