अकोला दिव्य न्यूज : अकोला व शहर व जिल्ह्यात गुन्हेगारांनी डोके वर काढले असून, आज उच्चभ्रु वसाहत असलेल्या आदर्श कॉलनी जवळपास ३० वर्षांपासून सुरू असलेल्या एका ज्वेलरी शॉपमध्ये भरदिवसा बंदुकीच्या धाकावर सोन्या-चांदीच्या ऐवजाची लूट झाल्याची धक्कादायक घटना घडली. सतत वर्दळीचा परिसर असलेल्या घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या भागातील रहिवासी व शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श कॉलनी परिसरातील सप्तश्रृंगी ज्वेलर्स या नावाने ओळखले जाणाऱ्या दुकानात दुकान मालक जितू विसपुते आज गुरुवार ७ मे २०२५ रोजी दुपारच्यावेळी एकटेच दुकानात बसले होते. दरम्यान हातात बंदूक घेऊन एक अज्ञात इसम दुकानात शिरला. सदर इसमाने मालकाला बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील मौल्यवान सोन्या-चांदीचा ऐवज लुटला. काही क्षणांतच माल घेऊन आरोपी घटनास्थळावरून पसार होताच व्यावसायिकाने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत आरोपी फरार झाला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, दरोडेखोर एकटाच आला होता. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. खदान पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सराफा दुकानात दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकावर लुट शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी घटनेची प्राथमिक माहिती देत आरोपीचा लवकरच शोध घेण्यात येईल, असे सांगितले.
