अकोला दिव्य न्यूज : प्रत्येक प्रवासाची सुरुवात एक छोट्या पावलानं होते…अशाच त्या छोट्या पावलांनी प्रवासाचा पहिला टप्पा पार केल्यानंतर सन्मित्र पब्लिक स्कूल येथे आयोजित UKG च्या पदवीदान समारंभात चिमुकल्यांना वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला. गोदावरी बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आयुष्यातील पहिला शैक्षणिक टप्पा पार केल्याबद्दल विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत व मुख्याध्यापिका मनीषा राजपूत उपस्थित होते.

काळा गाऊन आणि कॅप परिधान केलेली ही निरागस मुले आज खऱ्या पदवीधरांप्रमाणे दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यांतील चमक आणि मनातील उत्सुकता प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्शून जात होती. पालकांनीही आपल्या मुलांच्या या अविस्मरणीय क्षणांना कॅमेऱ्यात कैद करताना भावनांनी ओथंबून गेले.
चिमुकल्यांच्या हातात पदवी प्रमाणपत्र देताना जणू त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशा आणि आशीर्वादच दिले जात होते. केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडवण्याचा ध्यास घेतलेली ही शाळा, खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देत आहे. यावेळी मुख्याध्यापिका मनीषा राजपूत म्हणाल्या की, केजीमधून पहिल्या वर्गात जाणे हा मुलांच्या आयुष्यातील पहिला मोठा टप्पा आहे. आजचा हा क्षण त्यांच्या आणि पालकांच्या आयुष्यात कायम स्मरणात राहील. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शाळेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत यांनी चिमुकल्यांचे मनापासून कौतुक करत त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी आशीर्वाद दिला. कार्यक्रमाचे संचालन प्राजक्ता उपशाम यांनी केले. या भावनिक व आनंददायी सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
