डिजिटल युगात महिलांची झेप ! टॅली-GST कोर्समधून थेट रोजगार

0

अकोला दिव्य न्यूज : महिलांच्या सक्षमीकरणासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या टॅली विथ GST या मोफत सर्टिफिकेट कोर्सच्या प्रशिक्षण वर्गांना उत्साहात प्रारंभ झाला असून, या पुढील ३ महिन्यांत किमान ११ महिलांना हक्काने स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

मनपा गटनेता तथा नगरसेवक निलेश देव तसेच अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेला हा उपक्रम महिलांना केवळ प्रशिक्षण देणारा नसून रोजगाराच्या प्रवाहात आणणारा एक प्रभावी प्रयत्न ठरत आहे.या उपक्रमातील विशेष बाब म्हणजे प्रशिक्षण देणारी तब्बल ३५ वर्षांचा अनुभव असलेल्या संस्थेमार्फत महिलांना पूर्णपणे मोफत व दर्जेदार प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे प्रशिक्षणाचा दर्जा व परिणामकारकता अधिक बळकट होत आहे.

या कोर्समध्ये टॅली सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अकाउंटिंग, बिलिंग, बॅलन्स शीट तयार करणे तसेच GST (वस्तू व सेवा कर) रिटर्न फाइलिंग, कर व्यवस्थापन व व्यवहारांची सखोल माहिती दिली जात आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष कामासाठी आवश्यक कौशल्य सहज आत्मसात करता येत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना स्थानिक उद्योग व्यवसाय आणि कार्यालयांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार असून, काही महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्यही केले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी ३ महिने असून, कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना MKCL, पुणे व YCMOU, नाशिक यांचे संयुक्त प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

मागील वर्षी ११ महिलांना मोफत शिलाई मशीन देऊन त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या यशस्वी उपक्रमाच्या पुढील टप्प्यात यावर्षी जास्त व्यापक स्वरूपात कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम महिलांना केवळ शिक्षण देत नाही, तर आत्मविश्वास, स्वाभिमान व आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा देतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या विचारांना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here