अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : राज्यातील अन्न व औषधी सुरक्षा प्रशासन आयुक्तांच्या बेधडक कारवाईमुळे ग्राहकांच्या आरोग्य व जिवीताशी थेट खेळ करणारे संतापजनक प्रकार उघडकीस येत असून शहरातील नामांकित मॉलमधून खरेदी केलेल्या ‘सीताश्री-लक्ष्मीनारायण’ कंपनीच्या काजूकतलीच्या बॉक्समध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ब्रांडेड मिठाईच्या नावाखाली ग्राहकांना नेमके काय विकले जात आहे? असा संतप्त सवाल या घटनेनंतर नागरिक उपस्थित करत आहेत.

नेमका काय घडला प्रकार ? : मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने बुलढाण्यातील रिलायन्स मॉलमधून ‘सीताश्री-लक्ष्मीनारायण’ कंपनीचा काजूकतलीचा बॉक्स खरेदी केला होता. घरी जाऊन हा बॉक्स उघडला असता, त्यातील मिठाईवर मोठ्या प्रमाणावर बुरशी साचलेली दिसून आली. एवढेच नाही तर काजूकतलीवर जिवंत अळ्या वळवळताना आढळल्याने ग्राहकाला धक्का बसला. संबंधित उत्पादनावरील बॅच/बारकोड क्रमांक 8906151422017 असल्याचे नमूद आहे. मिठाईतील हा किळसवाणा प्रकार निदर्शनास येताच ग्राहकाने तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार नोंदवली.
FDA पथकाची रिलायन्स मॉलवर धडक. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी जि.के.वसावे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएच्या पथकाने बुलढाण्यातील रिलायन्स मॉलवर थेट धाड टाकली. घटनास्थळी पोहोचून पथकाने संबंधित काजूकतलीच्या तुकड्यांची आणि मॉलमध्ये उपलब्ध असलेल्या संपूर्ण मिठाईच्या साठ्याची पाहणी केली. एफडीएकडून या मिठाईचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. याशिवाय मॉल मधील इतर अन्नपदार्थांच्या साठ्याचीही तपासणी सुरू आहे.

सणासुदीच्या काळात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.: नामांकित ब्रँड्सवर नागरिक डोळे झाकून विश्वास ठेवतात. मात्र, अशा प्रकारचा दूषित आणि विषारी अन्नसाठा विकला जात असल्याने ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित मॉल आणि मिठाई उत्पादक कंपनीवर एफडीए प्रशासन कडक कायदेशीर कारवाई करणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.