अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोला शहरालगतच असलेल्या निंबी मालोकार आणि घुसर या दोन खेडेगावात रविवारी दुपारी आणि रात्रीला दोन जणांचा हत्येचा रक्तरंजित थरार उडाल्याने अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. निंबी मालोकार येथे दुपारी ४ वाजताच्या सुमारास एकावर चक्क गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या घटनेची शाई वाळत नाही तोच घुसर येथे रात्रीला एका २३ वर्षांच्या तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाड घालून खून करण्यात आला. शेतीच्या जमिनीच्या जुन्या आणि विकोपाला गेलेल्या वादातून एका शेतकऱ्यावर अंधाधुंद गोळीबार करून त्याचा जागीच निर्घृण खून केल्याची तर सामान उधारीवर देण्याचा वादातून चक्क कुऱ्हाडीने ठार करण्यात आले.

या अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निंबी (मालोकर) आणि घुसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. रविवारी (ता.९) भरदिवसा घडलेल्या या थरारक हत्याकांडामुळे निंबी मालोकर आणि घुसर गावात तीव्र घबराट व प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निंबी मालोकार येथे घडलेल्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव अमोल गजानन मालोकर (वय ४५, रा. निंबी मालोकार) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल मालोकर यांच्याशी शेतजमिनीच्या वादावरून गेल्या काही काळापासून गंभीर वितुष्ट सुरू होते. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीही या जमिनीच्या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. रविवारी दुपारी अमोल मालोकर हे त्यांच्या शेतात असताना आरोपी तेथे पोहोचला आणि दोघांमध्ये पुन्हा वाद पेटला. या वादाचा भडका उडताच आरोपीने जवळ बाळगलेले बेकायदेशीर पिस्तुल काढून अमोल यांच्यावर थेट गोळीबार केला. पाठीत आणि पायात गोळ्या घुसल्याने अमोल मालोकर हे रक्ताच्या थारोळ्यात शेतातच कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येचा थरार घडवल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला.घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमिनीच्या वादात थेट बेकायदेशीर पिस्तुलचा वापर होणे पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे.

अकोट फाईल पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या घुसर गावात काल रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास सामान उधारीवर देण्याचा कारणावरून गावातील श्रीमंत श्रीकृष्ण गोपनारायण (वय४०) आणि कुलदीप तारापुरे (वय२३) यांच्यात वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेला असता गोपनारायण याने कुलदीप तारापुरेच्या डोक्यात कुऱ्हाड घालून गंभीर जख्मी केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जख्मीला तातडीने रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच कुलदीपचा मृत्यू झाला होता. दरम्यान पोलिसांनी गोपनारायणला ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करून, शवविच्छेदन करण्यासाठी कुलदीपचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.