100 वर्षात पहिल्यांदा ! अकोल्याचे उद्योजक सिध्दार्थ रूहाटिया महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष

0

सुमित मालानी, कैलाश खंडेलवाल, पंकज राठी परिषद सदस्य• अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भातील उद्योग व्यवसाय क्षेत्रातील ख्यातनाम रुहाटिया ग्रुपचे संचालक व विविध व्यावसायिक व सामाजिक संस्थेत सक्रीय सहभागी युवा उद्योजक सिध्दार्थ रूहाटिया यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या निवडणुकीत उपाध्यक्ष पदावर अविरोध निवड झाली आहे. विदर्भातील व्यावसायीक आणि उद्योजकांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्र चेंबरमध्ये विदर्भाचे स्थान बळकट केले असून, परिणामी यंदा विदर्भातील सर्वच्यासर्व ११ जिल्ह्यातील उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. अत्यंत खेळीमेळीच्या आणि शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल काल सोमवार १५ जून रोजी जाहीर करण्यात आला.

महाराष्ट्र राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्रासाठी कार्यरत संस्थांमध्ये सर्वात प्रभावशाली संस्थांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या यंदा पार पडलेल्या निवडणुकीत विदर्भाने ऐतिहासिक यश मिळवले आहे.

या निवडणुकीत अकोला शहरातील सुमित पुरूषोत्तम मालानी, अमित पडगिलवार, कैलाश खंडेलवाल, पंकज सतिष राठी तसेच संतोष मुंधडा, दिनेश समद्दार, उमेश नरनोलिया, प्रकाश सावजी, राजन ठाकूर, राहुल खराबे, जितेंद्र कुमार छाबरा, पंकज बाजड, नंदकिशोर राऊत, पारस कोठारी आणि मुकेश पारेख यांची गव्हर्निंग कौन्सिल सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. वरिष्ठ उपाध्यक्षपदी करुणाकर शेट्टी व संगिता पाटील यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र चेंबर ही राज्यातील व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्रातील एक प्रमुख संघटना असून, ती सरकार आणि उद्योग यांच्यात एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते. चेंबरचे विदर्भ मुख्यालय लवकरच अकोला येथे स्थापन करण्याची योजना आहे, ज्यामुळे या प्रदेशातील उद्योग आणि व्यापाराला नवी चालना मिळेल.असे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सिद्धार्थ रुहाटिया यांनी अकोला दिव्य सोबत बोलताना सांगितले.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक होत असून यामध्ये राज्याचे कामकाज,उद्योग आणि कृषी क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर धोरण ठरवले जाईल. वाढणाऱ्या औद्योगिक घडामोडी आणि व्यावसायिक सहभागामुळे, महाराष्ट्र चेंबरमधील विदर्भाचे महत्त्वपूर्ण स्थान हे या प्रदेशासाठी एक अभिमानास्पद यश मानले जात आहे. हा निवडणुकीचा निकाल राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण मानला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here