अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : यंदा तिथींची वाढ झाल्याने लाडक्या गणपती बाप्पाचा मुक्काम १ दिवसाने वाढला आहे. गणेशोत्सव नेहमीपेक्षा मोठा म्हणजे १२ दिवसांचा झाला आहे.आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. तेव्हा मात्र काहींचं मत आहे की, १२ वा दिवस मुर्ती विसर्जनासाठी योग्य नाही. यामुळे मग उद्या गुरुवार २४ सप्टेंबरला गणेश मुर्तीचं विसर्जन करावं किंवा कलश आणि मुर्ती हलवून शुक्रवार २५ सप्टेंबरला विसर्जन करावं ? अशी द्विधा मनस्थिती झाली आहे. काहींच्या मते हो आणि कांहीच म्हणनं आहे नाही. तेव्हा गणपती बाप्पाला नेमका निरोप कधी द्यावा ? असा संभ्रम निर्माण झाला आहे ?.

धार्मिक दृष्टिकोनातून गणेशोत्सवाचा कालावधी वाढणे शुभ संकेत मानला जातो. याचे महत्त्व विशद करताना सांगितले जाते की, बाप्पाचा अधिक काळ पाहुणचार करण्याची संधी मिळाली आहे. बुद्धी, सुख व समृद्धीचे दाते असलेल्या गणपती बाप्पाची आपल्या घरात अधिक काळ सेवा-भक्ती अर्पण करण्याची संधी मिळणे भाग्यवान मानले जाते. जेवढे जास्त दिवस बाप्पाचे वास्तव्य राहून आरती आणि पूजा अर्चा होते, तेवढी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते. हे धार्मिक दृष्ट्या योग्य असले तरी गणेश भक्तांच्या या दुविधेला दूर करण्यासाठी शास्त्र काय सांगते ? हे तपासून घेणे आवश्यक आहे.
धर्मशास्त्रात गणेश विसर्जन हे सामान्यतः विषम दिवसांमध्ये (१.५, ३, ५, ७, किंवा ११ व्या दिवशी ) करण्याची परंपरा आहे. परंतु, अनंत चतुर्दशीच्या तिथीला अनन्य साधारण महत्त्व असल्यामुळे, दिवसांची संख्या १२ होत असली तरीही २५ सप्टेंबरलाच विसर्जन करणे पूर्णपणे शास्त्रसंमत व शुभ आहे. हे तपासून घेतले तर हिंदू पंचांग आणि धर्मशास्त्रानुसार, गणपती विसर्जन मुख्यत्वे अनंत चतुर्दशीला केले जाते.यंदा अनंत चतुर्दशी तिथीची सुरुवात गुरूवार २४ सप्टेंबरला रात्री ११:१८ वा. होत असली, तरी उदयातिथीनुसार मुख्य अनंत चतुर्दशी व गणेश मुर्ती विसर्जन शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजीच मानले गेले आहे.

ज्योतिषशास्त्रात तिथीची वृद्धी ही रिक्तता दूर करून जीवनात समृद्धी व लाभ वाढवणारी मानली जाते. तर हिंदू धर्मात ‘उदयातिथी’ (सूर्योदयाच्या वेळची तिथी) मानण्याची पद्धत असून उद्या गुरुवार २४ सप्टेंबर रात्री ११:१८ वाजल्यापासून चतुर्दशी तिथी सुरू होत आहे. त्यामुळे शुक्रवार २५ सप्टेंबरला सूर्योदयाच्या वेळी चतुर्दशी तिथी असल्यामुळे याच दिवशी मुख्य विसर्जन आणि अनंत चतुर्दशी व्रत पाळले जाईल. गणेशोत्सवाचा कालावधी वाढणे हा खूप मोठा शुभ संकेत मानला जातो.
पंचांगानुसार ग्रहांची गती आणि तिथींची वाढ या खगोलशास्त्रीय कारणांनी असे घडते. तरीही अपरिहार्य कारणास्तव वा परंपरेनुसार ११ व्या दिवशी म्हणजेच २४ सप्टेंबरला विसर्जन करायचे असेल, तर रात्री तिथी सुरू झाल्यानंतर कलश हलवून विसर्जन करू शकता. शास्त्रानुसार, विसर्जन करण्यापूर्वी ‘उत्तरपूजा’ केली जाते. उत्तरपूजा केल्यानंतर मूर्ती तिच्या जागेवरून थोडी हलवली जाते, ज्याला ‘बाप्पाचे प्रस्थान’ मानतात.२४ सप्टेंबर रोजी रात्री ११:१८ नंतर चतुर्दशी तिथी सुरू होत असल्याने, गुरुवारी २४ सप्टेंबरच्या उत्तररात्री किंवा रात्रीच्या शुभ मुहूर्तावर उत्तरपूजा करून मूर्ती व कलश हलवू शकता. जर ११ व्या दिवशीच विसर्जन उरकायचे असेल, तर २४ सप्टेंबर रोजी रात्री चतुर्दशी तिथी लागल्यानंतर विधीपूर्वक विसर्जन केले जाऊ शकते.
२५ सप्टेंबर २०२६ रोजी विसर्जनाचे शुभ मुहूर्त : २५ सप्टेंबरला विसर्जन करणार असाल, तर पंचांगानुसार खालील शुभ चौघडिया मुहूर्त आहेत: सकाळचा मुहूर्त (चर, लाभ, अमृत): सकाळी ०६:११ ते सकाळी १०:४२ पर्यंत.दुपारचा मुहूर्त (शुभ): दुपारी १२:१३ ते दुपारी ०१:४३ पर्यंत.संध्याकाळचा मुहूर्त (चर): दुपारी ०४:४४ ते संध्याकाळी ०६:१४ पर्यंत.रात्रीचा मुहूर्त (लाभ): रात्री ०९:१४ ते रात्री १०:४३ पर्यंत.थोडक्यात सांगायचे तर: जरी यंदा १२ दिवस होत असले तरी २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करणे सर्वात उत्तम राहील. जर अपरिहार्य कारणास्तव किंवा परंपरेनुसार २४ सप्टेंबरला करायचे असेल, तर रात्री तिथी सुरू झाल्यानंतर तुम्ही कलश हलवून विसर्जन करू शकता. त्यामुळे कोणत्याही संभ्रमात न पडता २५ सप्टेंबरलाच बाप्पाला अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने निरोप द्या.
टीप : गणेश उत्सवाची सांगता आणि मुर्ती विसर्जन संदर्भात धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ही बातमी आहे. अकोला दिव्य कुठल्याही बाजूने दावा करत नाही.
