Tuesday, May 12, 2026
No menu items!
No menu items!
Homeभारताच्या अडचणीत मोठी वाढ ! जनता होरपळणार महागाईचा वणव्यात

भारताच्या अडचणीत मोठी वाढ ! जनता होरपळणार महागाईचा वणव्यात

अकोला दिव्य न्यूज : इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने प्रतिउत्तर देण्यास सुरुवात केल्यानंतर संघर्ष वाढला आहे. गल्फमधील सर्व व्यावसायिक उड्डाणे स्थगित करण्यात आली असून आतापर्यंत ६००० उड्डाणे रद्द करण्यात आली.अमेरिकन तळांवरील हल्ल्यांमध्ये काही लष्करी विमाने कोसळली. विशेषत: इराणने बहरीन, कुवेत, युएई आणि इराकमधील तळांना लक्ष्य केल्याने अमेरिकन सैन्य सतर्क झाले आहे. जागतिक तेल पुरवठ्यावरही परिणाम झाला असून, हा संघर्ष जागतिक बाजारासाठी गंभीर आव्हान ठरला आहे. तणावामुळे जागतिक वित्तीय बाजार, विमान उद्योग आणि तेल कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. इराणने सौदी अरेबियातील सरकारी मालकीच्या सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या रास तनुरा तेल शुद्धीकरण प्रकल्पावर (रिफायनरी) ड्रोन हल्ला केला. हल्ल्यानंतर अरामकोने सोमवारी या रिफायनरीला तात्पुरते बंद केले. या बंदीच्या बातमीनंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ९.३२ टक्क्यांनी वाढल्या, तर जागतिक बाजारात अस्थिरता दिसून आली. मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे भारतातील शेअर बाजार कोसळले आहे.

अकोला दिव्य ग्राफिक्स

अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या लष्करी संघर्षाला इराणने आता अत्यंत आक्रमक वळण दिले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने सोमवारी जगातील सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग ‘होर्मुझ सामुद्रधुनी’ अधिकृतपणे बंद करण्याची घोषणा केली. इतकेच नव्हे, तर या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला ‘आग लावून भस्मसात’ करण्याची थेट चेतावणी इराणने दिली आहे.

इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, IRGC च्या कमांडर-इन-चीफचे वरिष्ठ सल्लागार ब्रिगेडियर जनरल सरदार इब्राहिम जबारी यांनी ही घोषणा केली. त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, होर्मुझ सामुद्रधुनी आता पूर्णपणे बंद आहे. जर कोणीही हा जलमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला, तर आमचे गार्ड्स आणि नौदलाचे जवान त्या जहाजांना आग लावून नष्ट करतील.

सौजन्य: गुगल

युद्धाचा शेअर बाजाराला मोठा फटका
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. व्यवहाराच्या सुरुवातीच्या तासांमध्ये सेन्सेक्स २,७४३ अंकांनी कोसळून ८,५४३.७३ वर आला; तर निफ्टी ५० मध्ये ५१९ अंकांची घसरण होऊन तो २४,६५९.२५ वर पोहोचला. दिवसाच्या उत्तरार्धात सेन्सेक्सने काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न केला असला तरीही बाजार १,०४८ अंकांच्या (१.२९%) घसरणीसह बंद झाला. सोमवारी दुपारी ३:५० च्या सुमारास निफ्टी १.२४ टक्क्यांच्या घसरणीसह २४,८६५ वर व्यवहार करत होता. शेअर बाजारातील भीषण घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात ७.५ लाख कोटी रुपयांची घट झाली.

कोणकोणत्या कंपन्यांचे शेअर्स घसरले?
रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये सोमवारी मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवल ४६३.५० लाख कोटी रुपयांवरून घसरून ४५५.७० लाख कोटी रुपयांवर आले आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ६५० हून अधिक कंपन्यांच्या शेअर्सनी सोमवारी ५२ आठवड्यांतील नीचांकी पातळी गाठली होती. यात प्रामुख्याने एसीसी, ॲबॉट इंडिया आणि आलोक इंडस्ट्रीज यांसारख्या कंपन्यांचा समावेश होता. एकूण ३,७६५ सक्रियपणे व्यवहार झालेल्या शेअर्सपैकी तब्बल ३,०१४ शेअर्स घसरणीत होते; तर केवळ ५९६ शेअर्स वाढीत होते. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ७,५३६.३६ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुमारे १२,२९२.८१ कोटी रुपयांची खरेदी करून बाजार सावरण्याचा प्रयत्न केला.

कच्च्या तेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला. या युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा मोठा फटका भारतासारख्या तेल आयातदार देशाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडच्या किमतीत नऊ टक्क्यांची वाढ होऊन ते ७९.४१ डॉलर्स (सुमारे ७,२६६ रुपये) प्रति बॅरलवर पोहोचले होते. त्याआधी शुक्रवारी ही किंमत ७२.८७ डॉलर्स होती. जगातील एकूण सागरी तेल व्यापारापैकी २० टक्के व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. सध्या हा मार्ग अधिकृतपणे बंद करण्यात आला नसला तरीही संभाव्य हल्ल्याच्या भीतीने तेलवाहू जहाजांची वाहतूक ठप्प झाली आहे. राईस्टॅड एनर्जीचे तज्ज्ञ जॉर्ज लिओन यांच्या मते, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज १५ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा थांबला आहे. जर तणाव लवकर निवळला नाही, तर तेलाच्या किमतीत आणखी मोठी वाढ होऊ शकते.

भारताच्या अडचणीत कशी झाली वाढ?
भारत दररोज ५.५ दशलक्ष बॅरल तेलाचा वापर करतो आणि आपली ८० टक्के गरज आयातीद्वारे पूर्ण करतो. भारताची एकूण कच्च्या तेलाची निम्मी आयात आणि जवळपास सर्व एलपीजी खरेदी होर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच होते. गेल्या दोन महिन्यांत भारताने रशियन तेलावरील अवलंबित्व कमी करून पश्चिम आशियातील देशांकडून (इराक, सौदी अरेबिया, युएई आणि कुवेत) होणारी आयात ५० टक्क्यांपर्यंत वाढवली आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारत रशियन तेल खरेदी थांबवणार आहे. त्यामुळे भारताचे आखाती देशांवरील अवलंबित्व अधिक वाढले असून बाजारपेठेतील अनिश्चिततेचा फटका भारताला बसू शकतो. तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी अस्थिरता निर्माण होईल. यादरम्यान ओपेक देशांनी एप्रिलमध्ये दररोज २,०६,००० बॅरल अतिरिक्त उत्पादन करण्याचे आश्वासन दिले आहे. जर आखाती देशांतून होणारा पुरवठा दीर्घकाळ विस्कळीत राहिला आणि सौदी-ओपेक देशांनी उत्पादन वाढवले नाही, तर भारत पुन्हा एकदा वेगाने रशियन कच्च्या तेलाकडे वळू शकतो.

बासमती तांदळाची निर्यात थांबली
पश्चिम आशियातील युद्धामुळे भारताच्या कृषी निर्यातीसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. इराण आणि इराक यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये होणारी बासमती तांदळाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली असून रुपयाचे मूल्यही कमालीचे घटले आहे. ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे सरचिटणीस व फॉर्च्युन राईस लिमिटेडचे संचालक अजय भालोटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण हा भारतीय बासमती तांदळाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी इराणकडून मोठ्या प्रमाणावर आयातीची ऑर्डर मिळाल्याने देशांतर्गत बाजारात बासमती तांदळाचे भाव प्रति किलो १० रुपयांनी वाढले होते. सध्या भारताकडून इराणला मोठ्या प्रमाणात तांदूळ पाठवण्यात आला आहे. मात्र, बदललेल्या परिस्थितीमुळे इराणमधील आयातदार हा माल स्वीकारू शकतील का, याबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे. भारताच्या एकूण बासमती निर्यातीपैकी इराणचा २५ टक्के वाटा, तर इराकचा २० टक्के वाटा आहे. या दोन देशांना होणारी निर्यात वर्षाला २ अब्ज डॉलर्स (सुमारे १८३ अब्ज रुपये) पेक्षा जास्त आहे. केवळ तांदूळच नव्हे, तर भारतीय चहाच्या निर्यातीलाही युद्धाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!