Friday, May 15, 2026
No menu items!
No menu items!
Homeडॉ.अभय पाटील यांचा शिवसेना (शिंदे) प्रवेश ? समन्वयक पवळ यांनी थेट केला...

डॉ.अभय पाटील यांचा शिवसेना (शिंदे) प्रवेश ? समन्वयक पवळ यांनी थेट केला संपर्क !

अकोला दिव्य न्यूज : स्वातंत्र्य पुर्व काळापासून ते अलिकडच्या काळापर्यंत अभेद असलेला अकोला शहर व जिल्ह्याचा गड दस्तुरखुद्द कॉग्रेस नेत्यांनीच खिळखिळा केला आणि मागच्या सहा-सात वर्षातील शहर व जिल्हा नेतृत्वामुळे कॉग्रेस कोमात गेली. यात तीळमात्र शंका नाही. अशा विपरीत परिस्थितीत स्वतःचे कार्यक्षम ‘नेटवर्क’, लोकांशी सरळ संपर्क, ठाम वैचारिक बैठक, सामाजिक बांधिलकीचे निस्वार्थ निर्वाहन आणि विश्वासार्हता या माध्यमातून डॉ. अभय पाटील यांनी कॉग्रेसला नवसंजीवनी दिली, यात तीळमात्र शंका नाही. गत वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. पाटील यांच्या उमेदवारीने विरोधी पक्षाला अक्षरशः घाम फुटला होता. लाखोचे मताधिक्य हजारांवर आले. ते केवळ पाटील यांच्या कर्तृत्वानेच!

डॉ.अभय पाटील यांनी उपसलेल्या कष्टानेच जिल्ह्यात कॉग्रेसमध्ये धग आली. हे कोणीही नाकारू शकत नाही. दरम्यान तब्बल ३० वर्षांनंतर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ ताब्यात आला. याकामी देखील डॉ. अभय पाटील यांनी सिंहाचा वाटा उचलला असताना, त्यांनी कॉग्रेससोबत फारकत घेतली. का ? आपल्या व्यक्तिगत कामामुळे आपण कॉग्रेस पक्षातून बाहेर आलो. असं पाटिल म्हणत आहेत. मात्र अँड. बाळासाहेब आंबेडकर यांना तिसऱ्या क्रमांकावर ठेवून पाटील हे काठावरच्या मतांनी पराभूत झाले. ही बाब लक्षात घेऊन कॉग्रेस पक्षश्रेष्ठींनी खरंतर पाटील यांना अधिकचे महत्व देणे आवश्यक होते. पण हेतुपुरस्सर या गोष्टींकडे कानाडोळा केला आणि पाटील यांनी कॉग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

एक प्रतिष्ठित व वैचारिक नेतृत्व म्हणून परिचित, अनेक वर्षांपासून वैद्यकीय, सामाजिक न्याय, युवकांसाठीचे उपक्रम आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात सक्रीय आणि स्वच्छ प्रतिमा व अभ्यासपूर्ण विचारांचे डॉ. पाटील हे अकोला जिल्ह्यात शिंदे गटाची पाळेमुळे घट्ट करण्यास सक्षम आहे, हे लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांच्या पक्ष प्रवेशाला हिरवा झेंडा दाखवताच राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी फोनद्वारे डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधून शिंदे सेनेत सहभागी होण्याची विनंती केली असून, या चर्चेला प्रारंभिक स्वरूप दिले गेले आहे. सध्या या प्रस्तावावर दोन्ही बाजूंनी मंथन सुरू असल्याची माहिती असून, पाटील यांचा अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पारंपरिक संघर्षात आता शिंदे सेना नवा पर्याय तयार करण्याच्या तयारीत असून, सामाजिक पातळीवर विश्वासार्ह आणि जनमानसात प्रभाव असलेल्या व्यक्तींचा पक्षात प्रवेश करून शक्ती वाढवण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. डॉ. अभय पाटील यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी त्यांच्या नजीकच्या वर्तुळात यावर गंभीरपणे चर्चा सुरू आहेत.

सध्या कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा अंतिम निर्णय झालेला नाही. जनतेच्या अपेक्षा, सामाजिक कार्याचा व्याप आणि भविष्यातील दिशा यांचा गांभीयनि विचार करत आहे, असे त्यांनी अलिकडेच एका खासगी चर्चेत म्हटल्याचे समजते.

काँग्रेसने अशा व्यक्तीला गमावले, ही पक्षासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. स्थानिक पातळीवरील विचारवंत, कार्यकर्ते आणि जनतेशी थेट नाळ जोडलेले नेतृत्व काँग्रेसने विसरल्याचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे. आता डॉ. पाटील जर शिंदे सेनेत सहभागी झाले, तर हा काँग्रेससाठी मोठा धक्काच होईल आणि अनेक समीकरणे बदलणार.

दरम्यान, काँग्रेसमधून बाहेर पडलेले डॉ. पाटील कुठल्या दिशेने जातील, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजप, राष्ट्रवादी, किंवा शिंदे गट यापैकी कुणाशी ते आपली राजकीय जोपासना करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या घडामोडी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाच्या ठरणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!