Friday, November 22, 2024
Homeताज्या घडामोडीगुगल मॅपमुळे २५ विद्यार्थी UPSC च्या परीक्षेपासून वंचित ! विद्यार्थ्यांना अश्रू अनावर

गुगल मॅपमुळे २५ विद्यार्थी UPSC च्या परीक्षेपासून वंचित ! विद्यार्थ्यांना अश्रू अनावर

अकोला दिव्य ऑनलाईन : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा आज देशभरात विविध ठिकाणी पार पडत आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सेंटर दिलेले असतात. त्या सेंटरवर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागते. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये काही विद्यार्थ्यांना गुगल मॅपवर चुकीचा पत्ता दाखवल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावं लागलं असल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा असल्यामुळे मराठवाड्यामधील काही जिल्ह्यातील विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरला परीक्षा देण्यासाठी आले होते. मात्र, त्यांनी परीक्षेसाठी देण्यात आलेल्या सेंटरचा पत्ता गुगल मॅपवर शोधला आणि त्या ठिकाणी पोहोचले.

पण तेथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की आपण सेंटरवर न पोहोचता दुसरीकडेच आलो आहोत. त्यानंतर विद्यार्थ्यांची मोठी धावपळ उडली. त्यानंतर काही वेळाने विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. पण तो पर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. जवळपास २० ते २५ विद्यार्थ्यांना या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपासून वंचित राहावं लागलं असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

आज आम्ही विवेकानंद कला, सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो. येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होती. आम्ही गुगल मॅपवर सर्च केलं आणि हा पत्ता टाकला. मात्र, या ठिकाणाहून हा पत्ता दुसरीकडे ११ किलोमीटरवर दाखवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला आणि त्यांना परीक्षा देता आली नाही. आज सकाळी ९ वाजता परीक्षेसाठी रिपोर्टींगची वेळ होती. त्यानंतर ९ वाजून ३० मिनिटांनी पेपर सुरू होणार होता. पण सकाळी ९ वाजून ५ मिनिटांच्या अंतरावर काही विद्यार्थी या ठिकाणी आले. पण तो पर्यंत उशीर झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना आतमध्ये परवानगी देण्यात आली नाही. नियमाप्रमाणे ९ वाजता गेट बंद झालं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी विनंती केली, आम्हाला चुकीचा पत्ता मिळाला. गुगल मॅपमुळे आम्ही चुकीच्या ठिकाणी पोहोचलो, त्यामुळे आम्हाला उशीर झाला. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही, परिक्षेला बसण्याची परवानगी मिळाली नाही. या गुगल मॅपच्या गोंधळामध्ये २० ते २५ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली.

काही विद्यार्थ्यांना अश्रू अनावर
आज देशभरात विविध ठिकाणी यूपीएससीची परीक्षा पार पडत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी वर्ष-वर्ष अभ्यास करत असतात. पण आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काही विद्यार्थ्यांना गुगल मॅपवर चुकीचा पत्ता दाखवल्यामुळे परीक्षा देता आली नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना यावेळी अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!