Friday, April 24, 2026
No menu items!
No menu items!
Homeघागर फोडो ! हजारो महिलांचा सहभाग ; वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

घागर फोडो ! हजारो महिलांचा सहभाग ; वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

अकोला दिव्य न्यूज : हद्दवाढ क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १४ व इतर भागांतील तीव्र पाणीटंचाई, मूलभूत सुविधांचा अभाव आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज शुक्रवार दि. २४ एप्रिल रोजी अकोला महानगरपालिका कार्यालयावर “घागर फोडो आंदोलन” करत भव्य मोर्चा काढण्यात आला. गांधी जवाहर बाग ते मनपा कार्यालय असा निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक, महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान ‘पाणी द्या, हक्क आमचा द्या’, ‘मनपा प्रशासन हाय हाय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विशेष म्हणजे, मोर्चाच्या मार्गात रुग्णवाहिकेला अडथळा होऊ नये म्हणून जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व महानगर अध्यक्ष तथा मनपा गटनेते निलेश देव यांनी स्वतः पुढाकार घेऊन मार्ग मोकळा करून दिला, हे आंदोलनाचे संवेदनशील व कौतुकास्पद चित्र ठरले.

आंदोलनाची पार्श्वभूमी
प्रभाग क्रमांक १४ हा हद्दवाढ क्षेत्रात येत असून, बहुतांश भागात आजही जलवाहिन्यांचा अभाव आहे. हद्दवाढ होऊन तब्बल १० वर्षे उलटली तरी विकासापासून हा भाग कोसो दूर आहे. मागील १५ दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात चारही नगरसेवकांनी आयुक्त व पाणीपुरवठा विभागाशी वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेतली नाही. अखेर संतप्त नागरिकांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले.
हजारोंच्या संख्येने महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असलेल्या आंदोलनाच्या शेवटी महापालिका समोर प्रतीकात्मक घागर फोडून तीव्र निषेध नोंदवला. आंदोलनानंतर स्वतः कार्यकर्त्यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबविले.

आंदोलनातील प्रमुख मागण्या
प्रभाग ३, ४, ५, १२, १३ व १४ मध्ये नियमित पाणीपुरवठा , प्रभाग १४ मध्ये तातडीने सुरळीत पाणीपुरवठा, जळालेला पंप त्वरित बदलून नवीन पंप बसवणे, टॅकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा, दलित वस्ती सुधारणा योजनेतील बचत निधी पाणीपुरवठ्यासाठी वापरणे, पर्यायी स्वरूपात इतर निधीतून कामे मंजूर करणे, अन्यायकारक घरकर रद्द करणे,रस्त्यांची साफसफाई व देखभाल,सार्वजनिक शौचालयाची उभारणी व दुरुस्ती, मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना व निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई व बदली करणे.

प्रशासनासोबत चर्चा व आश्वासन
आंदोलनानंतर शिष्टमंडळाने उपायुक्त विजय पारतवार व पाणीपुरवठा विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रशासनाने सोमवारपासून मलकापूर व शिवणी, गुडदी भागात टॅकरने पाणीपुरवठा सुरू करणे, ८ दिवसांत जळालेल्या पंपाऐवजी नवीन पंप बसवणे असे ठोस आश्वासन दिले. त्यामुळे उन्हात २ ते ३ तास आंदोलन करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

विलंबाने घेतली दखल
गेल्या १५ दिवसांपासून नगरसेवकांचा पाठपुरावा सुरू असतानाही प्रशासनाने दखल घेतली नाही. मात्र हजारोंचा मोर्चा आल्यानंतरच निर्णय घेतला गेला. त्यामुळे “मोर्चा काढल्याशिवाय प्रशासन जागे होत नाही का?असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.


या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे
जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महानगर अध्यक्ष तथा मनपा गटनेते निलेश देव, महिला जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संगीता अढाऊ, ज्ञानेश्वर सुलताने, माजी मनपा गटनेते गजानन गवई, महानगर महासचिव दामोदर जगताप, प्रभा शिरसाट, नगरसेविका उज्वला पातोडे, नगरसेवक शेख शमशु, सुनिल इन्नाणी, पराग गवई, नगरसेविका जयश्री बहाद्दुरकर, मनोहर बनसोड, विकास सदांशिव, किशोर तेलगोटे, नितेश किर्तक, बबलू पातोडे, किशोर जामनिक, प्रदीप खंडारे, मुकुंदराव सातपुते, माया इंगळे, प्रा.सुरेश पाटकर, निलेश वाघमारे, शेख साबीर, अशोक शिरसाट, शोभा शेळके, संगिता खंडारे, सचिन शिराळे, गोल्लू खिल्लारे, आशिष सोनोने, संजय वानखेडे, सौरभ बहादुरकर, अ‍ॅड. मिनल लोंडे, धिरज खंडारे, मंगेश बलखंडे, बुदरत्न इंगोले, राजेश मोरे यांच्यासह असंख्य आजी-माजी पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!