Friday, April 24, 2026
No menu items!
No menu items!
Homeवाशीम : माणूसकी मेली ! ‘आंबे लुटी’साठी उडाली प्रचंड झुंबड

वाशीम : माणूसकी मेली ! ‘आंबे लुटी’साठी उडाली प्रचंड झुंबड

अकोला दिव्य न्यूज : आधुनिक युगात माणुसकीची भावना लुप्त पावत चालली असून मानवी मनाच्या स्वार्थी वृत्तीमुळे त्याचा पदोपदी अनुभव येत आहे.याचाच प्रत्यय वाशीम जिल्ह्यात एका अपघात प्रकरणात आला आहे. आंबे घेऊन जाणारी मालवाहू मोटार वाशीम जिल्ह्याच्या दापुरा गावाजवळ उलटल्याने अपघात झाला. मालवाहू मोटारीमधील सर्व आंबे रस्त्यावर पडले. अपघातग्रस्तांना मदतीचा हात देण्याऐवजी परिसरातील नागरिकांची ‘आंबे लुटी’साठी प्रचंड झुंबड उडाली.

अपघातग्रस्त ट्रक मधून आंबे लुटताना लोक

असंख्य नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली. अपघातग्रस्त मोटारीतून पडलेले आंबे ते वेचून नेत होते. माणुसकी हरवल्याचे चित्र घटनास्थळावर होते. या घटनेची चांगलीच चर्चा रंगली.

अपघात आणि रस्त्यावर आंब्यांचा सडा
वाशीम जिल्ह्यात गुरुवारी घडलेल्या एका अपघाताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एका मालवाहू मोटारमधून आंब्यांची वाहतूक केली जात होती. यावेळी ही भरधाव मालवाहू मोटार जिल्ह्यातील दापुरा गावाजवळ रस्त्याच्या कडेला उलटली. मालवाहू मोटारीच्या या अपघातामुळे त्यातील सर्व आंबे रस्त्यावर व आजूबाजूला पडले. आंब्यांचा अक्षरशः सडा पडला होता. या अपघाताची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळावर बघ्यांची मोठ्या संख्येने गर्दी झाली. यावेळी नागरिक अपघातग्रस्त मोटारीतून पडलेले आंबे वेचण्यासाठी सरसावले. हे आंबे वेचण्यासाठी नागरिकांमध्ये प्रचंड चढाओढ लागली होती.

अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी पडलेले आंबे वेचण्याला नागरिकांनी प्रथम प्राधान्य दिले. रस्त्यावरून येणारे-जाणारे दुचाकीस्वार देखील आपले वाहन थांबवून आंबे गोळा करीत होते. आंबे गोळा करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक देखील विस्कळीत झाली. या घटनेची चित्रफित समाज माध्यमातून प्रसारित झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!