अकोला दिव्य न्यूज : श्री प्रेमप्रकाश आश्रमाच्या वार्षिकोत्सवासाठी अखिल भारतीय मंडलाध्यक्ष स्वामी भगत प्रकाश महाराज यांचे राजराजेश्वर नगरीत स्थानिक बाबा हरदासराम नगर (सिंधी कॅम्प) येथील ‘अमुलरतन भवन’ मध्ये शुभ आगमन झाले. या निमित्ताने पूज्य सिंधी जनरल पंचायत अकोला तर्फे स्वामीजींचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. वार्षिकोत्सवाच्या मुख्य सोहळ्यात सिंधी समाजाच्या पारंपरिक पद्धतीने “थाल भेंट” देऊन आणि भव्य पुष्पहार अर्पण करून स्वामी भगत प्रकाशजी महाराजांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी स्वामी हरिओमलाल आणि इतर संत मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.

पंचायतीच्या वतीने घेतले आशीर्वाद
पूज्य सिंधी जनरल पंचायत अकोलाचे अध्यक्ष कन्हैयालालजी रंगवानी यांच्या नेतृत्वाखाली सिंधी समाजाच्या विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी स्वामीजींचे आशीर्वाद घेतले. यामध्ये प्रादेशिक पंचायत अध्यक्ष भेरूमल वाधवानी, हरीश आनंदानी, हरीश पारवानी, गिरधर पोपटानी, मणीभाई जसमतिया, उपाध्यक्ष कोडुमल चावला, सुरेश संतानी, सरचिटणीस धीरज बसंतानी, सचिव गोपाल कटारिया, जनसंपर्क अधिकारी दीप मनवानी तसेच कार्यकारिणी सदस्य नगरसेवक हरीश आलीमचंदानी, जगदीश जेठानी, प्रकाश खबरानी, सुनील जेसवानी, इंद्रलाल कटारिया, सोनू जसवानी आणि दीपक माई यांचा प्रामुख्याने समावेश होता. स्वामीजींनी सर्व उपस्थितांना दुशाला (शाल) आणि प्रसाद देऊन आशिर्वाद दिला.
महाराष्ट्राला पाणीटंचाईतून मुक्त करण्यासाठी साकडे
या सोहळ्यात पूज्य पंचायतीच्या वतीने जनसंपर्क अधिकारी दीप मनवानी यांनी स्वामीजींना एक विशेष विनंती केली. अकोल्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्याला पाणीटंचाईच्या समस्येतून कायमची मुक्ती मिळावी, यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करावी, असे साकडे त्यांनी घातले. या संवेदनशील विनंतीला मान देऊन स्वामी भगत प्रकाशजी महाराज आणि उपस्थित संत मंडळींनी तत्काळ मधुर भजनाच्या माध्यमातून ईश्वराकडे भरपूर पाऊस पडू दे आणि पाणीटंचाई दूर कर, अशी आर्त आळवणी केली. या भजनाने संपूर्ण आश्रम परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता.
