Home५ हजारांची मदत ही शेतकऱ्यांची क्रुर थट्टाच - किसान काँग्रेसचे निवेदन

५ हजारांची मदत ही शेतकऱ्यांची क्रुर थट्टाच – किसान काँग्रेसचे निवेदन

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली ५ हजार रुपयांची आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असून, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ती पूर्णपणे अपुरी आहे. त्यामुळे या मदतीचा तीव्र निषेध नोंदवत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी किसान काँग्रेस, अकोला यांच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.

अकोला जिल्ह्यात अनियमित पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे कापूस, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि सिंचनावरील खर्चाचा बोजा कायम आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडले असून, त्यांच्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.या परिस्थितीत जाहीर केलेली ५ हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यास पुरेशी नसल्याची भूमिका किसान काँग्रेसने मांडली आहे.

निवेदनातून शासनाकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :
१. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान ₹५०,००० आर्थिक मदत तातडीने द्यावी.
२. शेतकऱ्यांची सर्व चालू व थकीत पीककर्जे सरसकट माफ करावीत; केवळ कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांची बोळवण करू नये.
३. बँका व पतसंस्थांकडून सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली, नोटिसा आणि जप्तीची कारवाई तात्काळ थांबवावी.
४. दुष्काळग्रस्त भागातील शेतीपंपांचे वीजबिल माफ करून वीज तोडण्याची कारवाई थांबवावी.
५. पीक नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नियमानुसार देय असलेली संपूर्ण पीकविमा भरपाई तातडीने द्यावी.
किसान काँग्रेसच्या मते, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केवळ तुटपुंजी मदत जाहीर करून शासनाची जबाबदारी संपत नाही. शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेऊन ठोस आर्थिक मदत, कर्जमाफी आणि इतर आवश्यक सवलती देणे गरजेचे आहे. शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून, संकटाच्या काळात त्याला सन्मानाने उभे राहता येईल, अशी मदत शासनाने द्यावी.
शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास किसान काँग्रेस, अकोला यांच्या वतीने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर रवी पाटील अरबट जिल्हाध्यक्ष, किसान काँग्रेस, अकोला, अक्षय राऊत प्रदेश सचिव काँग्रेस, प्रशांत गावंडे, विजय देशमुख, सुगत भटकर, विनोद आंबुस्कर, प्रथमेश इंगळे, मोहम्मद एजाज, शंतनु लंगोटे, शेख अन्सार, सोमेश चव्हाण, संध्या भटकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सत्ताधाऱ्यांनी ५ हजारांत दिवाळी करून दाखवावी. शेतकऱ्यांचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही. सरकार असेच वागत राहिले तर पुढील परिणामांसाठी सरकारने तयार रहावे. असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव अक्षय राऊत यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular