Home'स्त्री'चा सन्मान-समाजाचा मान ! सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये 'कन्या' पूजन

‘स्त्री’चा सन्मान-समाजाचा मान ! सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये ‘कन्या’ पूजन

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ आणि ‘स्त्री’चा सन्मान हाच समाजाचा सन्मान’ हा बहुमोल संदेश समाजात पोहोचविण्यासाठी नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून येथील सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये कन्या पूजन उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. निलेश देव मित्र मंडळ व शाळेचे अध्यक्ष प्रदीप सिंह राजपूत आणि मुख्याध्यापिका मनीषा राजपूत यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

समाजातील मुलगा-मुलगी हा भेदभाव दूर करणे, मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि स्त्रीचा आदर व सन्मान राखण्याची भावना समाजात रुजविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमासाठी निलेश देव मित्र मंडळाचे विशेष सहकार्य लाभले. मंडळातील अनेक सदस्य सहपत्नीक कार्यक्रमात सहभागी होऊन शाळेतील विद्यार्थिनींचे विधिवत कन्या पूजन करून आदर व स्नेह व्यक्त केला. याप्रसंगी विद्यार्थिनींना भेटवस्तू व बक्षिसे देण्यात आली तसेच फळांचे वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर आयोजित या उपक्रमातून मुलींचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मुलींना समान संधी मिळावी, त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी आणि समाजात त्यांना सन्मानाचे स्थान मिळावे, हा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. शाळेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत आणि मुख्याध्यापिका मनीषा राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-सन्मान, समानता व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.

या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य देऊन विद्यार्थिनींचा प्रेमपूर्वक सन्मान केल्याबद्दल सन्मित्र पब्लिक स्कूलच्या वतीने निलेश देव मित्र मंडळातील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार आणि हार्दिक धन्यवाद व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular