• ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चा शुभारंभ •
अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ व्यासपीठावरून देण्याऐवजी तो हजारो विद्यार्थ्यांच्या हातातून घराघरात पोहोचविण्याचा अनोखा महासंकल्प अकोला शहरात साकारत आहे. शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता शहरातील चार ठिकाणी एकाच वेळी तब्बल २० हजारांहून अधिक विद्यार्थी शाडू मातीपासून गणेशमूर्ती घडविणार असून, या ऐतिहासिक उपक्रमासाठी भव्य सभामंडपांसह साहित्य वितरण आणि मार्गदर्शनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे.

अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाच्या पुढाकारातून होणाऱ्या या उपक्रमात सुमारे ३० शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मागील वर्षी १० हजार विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सहभागाला यंदा दुप्पट विस्तार देण्यात आला आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, एकाच दिवशी चार ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर शाडू माती गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्याचा हा आगळावेगळा उपक्रम ठरणार आहे.
चार ठिकाणी एकाच वेळी ‘गणेश’ घडणार!
छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तापडिया नगर; स्व. शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे पटांगण, जुने शहर; जानोरकर मंगल कार्यालय, रिंग रोड आणि प्रभात किड्स स्कूल, पातूर रोड या चार ठिकाणी कार्यशाळा होणार आहे. विशेष म्हणजे हजारो विद्यार्थी केवळ कार्यशाळा पाहणार नाहीत, तर स्वतःच्या हाताने शाडू मातीची गणेशमूर्ती घडविणार आहेत. पीओपीमुळे होणारे जलप्रदूषण, पर्यावरणपूरक विसर्जन, निर्माल्य व्यवस्थापन आणि गणेशोत्सवानंतर तुळस लागवडीचा संदेशही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. २० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षात घेऊन शाडू माती, लहान पाट, आईस्क्रीमचा चमचा, टूथपिक तसेच खाऊ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र वितरण पथक कार्यरत करण्यात आले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या उपक्रमात साहित्याची कमतरता भासू नये, यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे.

कार्यशाळेचे मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून शरद कोकाटे प्रा. डॉ. ज्ञानसागर भोकेर, प्रा. गजानन बोबडे, श्रीमती कल्पना राव, सौ. अमृता सेनाड व त्यांची टीम विद्यार्थ्यांना मूर्ती निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देणार.या उपक्रमासाठी गजानन नारे, डॉ.सुगत वाघमारे, प्रदीप नंद, माधवराव देशमुख, शार्दुल दिंगबर, विक्रम जानोरकार, प्रा. कुशल सेनाड, डॉ. पल्लवी दिवेकर आणि सौ. दिप्ती अग्रवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या याच दिवशी अकोल्यात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचीही नवी दिशा दाखविली जाणार आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तापडिया नगर येथे ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चा भव्य शुभारंभ होणार आहे.
हस्तकला, गृहउद्योग, घरगुती उत्पादने, वस्त्र, खाद्यपदार्थ आणि महिलांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तूंना या महाबाजारातून थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. ‘महिलांना हक्काचे व्यासपीठ’ या संकल्पनेतून महिलांच्या कौशल्याला ग्राहक, उत्पादनाला बाजारपेठ आणि आत्मनिर्भरतेला नवी ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
हा महाबाजार ४ ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान सुरू राहणार आहे.
अकोल्यासाठी शुक्रवारचा दिवस केवळ एका कार्यक्रमाचा नसून दोन सामाजिक चळवळींचा संगम ठरणार आहे. सकाळी हजारो विद्यार्थी शाडू मातीपासून गणेशमूर्ती घडवून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प करतील, तर सायंकाळी महिलांच्या कष्टातून तयार झालेल्या उत्पादनांना बाजारपेठ देत आत्मनिर्भरतेचा संदेश दिला जाणार आहे.
‘मातीची मूर्ती स्वतः घडवा… घरातच विसर्जन करा… आणि गणेशोत्सवानंतर तुळस लावा !’ या संदेशातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळाच्या पुढाकारातून साकारत असलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी आणि महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
या उपक्रमास अकोला महानगरपालिका, सुखकर्ता पर्यावरणपूरक अभियान, स्व. शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, प्रभात किड्स स्कूल, इनर व्हील क्लब ऑफ अकोला क्वीन्स, बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय आणि जानोरकर मंगल कार्यालय यांचे सहकार्य लाभत आहे.
