आपण आता खरेच स्वातंत्र्यांत आहोत ? हा प्रश्न विचारायला हवा – आयुक्त तुकाराम मुंढे

0

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो. त्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. पण, आपण आता खरेच स्वातंत्र्यांत आहोत का, हा प्रश्न विचारायला हवा. जे विचारच तुमचे नाहीत. तुम्ही वेगळ्याच विचारांमध्ये गुरफटून गेले आहात. ते विचार तुमच्यावर अल्गोरिदमने लादले आहे. तुम्ही तुमची विचार करण्याची क्षमता तपासून बघितली आहे. हे विचार स्वतःहून ओढवून घेतले आहे. त्यामुळे आता थोडी विश्रांती घेऊन विवेकवादी विचार करण्याची गरज असल्याचे मत राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.

संवाद तरुणाईशी या निमित्ताने जवळपास २१ वर्षांनंतर मुंढे यांचे अमरावती येथे आगमन झाले. येथील पोटे एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या स्वामी विवेकानंद सभागृहात काल शनिवारी सायंकाळी आयोजित ‘संवाद तरूणाईशी’ या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. मुंडे पुढे म्हणाले की, तरूणांच्या आंदोलनाच्या वेळी आपण पाहिले, प्रत्येक जण का नेता आहे, तर प्रत्येकाच्या आशा, आकांक्षा आहेत. ध्येय आहे. ज्यांना आपण आळशी म्हणतो, ज्यांना आपण त्याबद्दल प्रश्न विचारतो, ती ही पिढी सर्वात जास्त हवामान बदलाविषयी बोलते. ही पिढी सर्वात जास्त तंत्रज्ञानाविषयी बोलते, त्यावर काम करते. ही पिढी मानसिक आजाराबद्दल उघडपणे बोलते. एखादी गोष्ट स्वीकारण्यासाठी जे धाडस लागते, ते या पिढीमध्ये आहे. तुम्ही त्यांच्या धैर्याला साथ देणार आहात की नाहीं, हा प्रश्न आहे.

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त मुंढे यांनी तरूणांशी संवाद साधत जीवनातील अनुभवांविषयी मनमोकळेपणाने विचार व्यक्त केले. देशात नीट परीक्षा गैरव्यवहारावरून नुकतेच दिल्लीत तरूणाईचे आंदोलन झाले. त्यावर सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, संपूर्ण जगात बदलाचे वारे वाहत आहेत. आपल्या देशातही अलीकडे एक आंदोलन झाले. प्रवाहातील ओंडके म्हणून जगण्यापेक्षा प्रवाहाच्या विरोधात उंच उडी मारणाऱ्या माशाप्रमाणे जगा. ओंडक्याला अस्तित्व नाही. माशाला अस्तित्व आहे, कारण तो जिवंत आहे. केवळ मतदानाची टक्केवारी वाढणे म्हणजे लोकशाही सुदृढ होणे नव्हे, तर नागरिक म्हणून आपण किती जागरुक आहोत, आपण विवेकवादी विचार करीत आहोत का, यावरून त्या देशातील लोकशाही ही समृद्ध होत असते.

माझी वारंवार बदली होते. त्यावेळी माझे हितचिंतक मला म्हणतात, तुम्ही प्रवाहाच्या विरोधात का जाता. पाण्यात राहून मगरीशी वैर का घेता, असा प्रश्न देखील काही जण करतात, ‘सिस्टिम’मध्ये राहून सिस्टिम बदलता येणार नाही, असाही सल्ला अनेक जण देतात. पण, माझा विचार वेगळा आहे. मी सिस्टिमच्या विरोधात नाही. माझे मगरीशीही वैर नाही. पण जो प्रवाह ज्या दिशेने वेगाने चालला आहे, तो योग्य दिशेने आहे की नाही, हेच मी पाहतो. असे मुंढे म्हणाले.

तरूणांच्या पिढीला आता यशाची व्याख्या काय हे समजून घ्यावे लागेल. आपण हे यश मोठे घर, मोठा पगार, मोठी गाडी यात मोजत असू, पण या छोट्या गोष्टी आहेत. जगातील सर्वच श्रीमंत हे यशस्वी झाले असते. पैशांची गरज आहे, पण केवळ पैसा म्हणजे यश नाही. तरूणाई ही सध्या मोबाईलच्या जास्तीत जास्त संपर्कात आहे. त्यातून माहिती मिळते, पण ती अल्गोरिदमच्या स्वरूपात आहे. आपल्याला आवडते तेच आपल्याला मोबाईलमध्ये दिसते. त्याच रील्स आपण पाहतो आणि आत्ममग्न होतो.दुसऱ्यांचे विचार आपण ऐकत नाही. ही खरी समस्या आहे. असं तुकाराम मुंढे यांनी शेवटी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here