अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांमध्ये हक्क लढ्यासाठी नवीन उर्जा निर्माण करण्याचा निर्णय वाशिम जिल्हा मुख्य व सत्र न्यायाधीशांनी दिल्याने महाराष्ट्र सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. हा एक महत्त्वाचा निर्णय असून हा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.

आपल्या शेतजमीनीच्या अधिग्रहणाचा योग्य आणि हक्काचा मोबदला मिळवण्यासाठी कायदेशीर लढा देणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने वाशिम जिल्हा न्यायालयाने एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व निकाल दिला आहे. न्यायालयाने थेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोठा दणका देत, वाशिम जिल्ह्यातील धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. सरकारी यंत्रणेने न्यायालयाच्या आधीच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यामुळे मुख्य जिल्हा न्यायमूर्तींनी हा कडक पाऊल उचलले आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक आणि प्रदीर्घ लढा
वाशिम येथील शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांची अकृषक जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी अधिग्रहित करण्यात आली होती. मात्र, मोबदला देताना प्राधिकरणाने मोठी चलाखी केली. शेतकऱ्यांना केवळ प्लॉटचा मोबदला देण्यात आला, तर नियमानुसार मिळणारा रस्ते आणि खुल्या जागेचा मोबदला पूर्णपणे नाकारण्यात आला. जो मोबदला दिला, तो देखील चुकीचा आणि बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दराने देण्यात आला होता. या अन्यायाविरोधात गर्जे कुटुंबाने जिल्हाधिकारी व न्यायालयात कायदेशीर लढा सुरू केला. अखेर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देत महामार्ग प्राधिकरणाला वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्राधिकरणाने या आदेशाची अंमलबजावणी केली नाही.

२० जुलै अंतिम मुदत; अन्यथा टोल प्लाझावर टाळे!
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे संतप्त झालेल्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी महामार्ग प्राधिकरणाची संपत्ती असलेला तोंडगाव येथील टोल प्लाझा थेट जप्त करण्याचे वॉरंट काढले आहे. शेतकऱ्यांचे वकील उदय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला २० जुलै २०२६ पर्यंत शेतकऱ्यांचे थकीत पैसे भरण्याची अंतिम मुदत दिली आहे.

जर या मुदतीत पैसे जमा झाले नाहीत, तर २१ जुलै रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन टोल प्लाझा जप्त करण्याची कारवाई केली जाईल.” या निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, हा निकाल देशातील इतर पीडित शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरणार आहे.
