Saturday, June 27, 2026
No menu items!
No menu items!
Homeट्रान्सफॉर्मर नादुरुस्त ! अकोल्यात पाणीपुरवठा ठप्प ; अन्यथा प्रशासन जबाबदार- देव

ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त ! अकोल्यात पाणीपुरवठा ठप्प ; अन्यथा प्रशासन जबाबदार- देव

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : अकोला शहरातील पाणीपुरवठ्याचा कणा असलेल्या महान जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाल्याने गेल्या ४ दिवसांपासून सर्व शहरातील पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे. यामुळे नागरिकांवर कृत्रिम पाणीटंचाईची वेळ आली आहे. या गंभीर परिस्थितीबाबत तातडीने उपाययोजना करून भविष्यात अशा प्रकारचा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कायमस्वरूपी स्टँडबाय सुविधा उभारण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मनपा गटनेते व नगरसेवक निलेश देव यांनी केली आहे.

संग्रहित छायाचित्र

शहरात चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे आधीच विस्कळीत असलेले पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक भागांमध्ये ६ तर काही भागांमध्ये ८ ते १० दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळालेले नाही. यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून महिला,ज्येष्ठ नागरिक,लहान मुले व कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

महानगरपालिका प्रशासनाकडून टँकर सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात शहरातील बहुतेक हायड्रंट बंद असल्यामुळे टँकरद्वारे प्रभावीरीत्या पाणीपुरवठा होत नाही. सध्या केवळ एक खाजगी हायड्रंट सुरू असून त्याद्वारे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणे अशक्य आहे. हे प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे उदाहरण आहे. इतक्या मोठ्या शहराचा पाणीपुरवठा एकाच यंत्रणेवर अवलंबून ठेवणे अत्यंत धोकादायक असून महान जलशुद्धीकरण केंद्रामध्ये कायमस्वरूपी स्टँडबाय यंत्रणा, पर्यायी ट्रान्सफॉर्मर, बॅकअप विद्युत व्यवस्था आणि आपत्कालीन संचालन प्रणाली तातडीने उभारणे आवश्यक आहे.

तसेच दरवर्षी होणाऱ्या वार्षिक देखभाल (मेंटेनन्स) कामांचे वैज्ञानिक व वेळबद्ध नियोजन करावे. एक्सप्रेस फीडर उपलब्ध असतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होणे ही गंभीर बाब असून यासंदर्भात महानगरपालिका, वीज वितरण कंपनी व संबंधित तांत्रिक विभागाची उच्चस्तरीय संयुक्त आढावा बैठक तात्काळ बोलावण्यात यावी.

महानगरपालिकेकडे मालमत्ता कर विभागामार्फत संपूर्ण शहरातील नागरिकांचा मोबाईल डेटा उपलब्ध असताना नागरिकांना नेमक्या अडचणी, दुरुस्तीचा कालावधी, पर्यायी व्यवस्था आणि पाणीपुरवठ्याचे सुधारित वेळापत्रक याबाबत संदेशाद्वारे माहिती का दिली जात नाही? नागरिकांना अंधारात ठेवून प्रशासन जबाबदारी झटकू शकत नाही.

Oplus_131072

अकोलेकर नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही यासाठी तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यात याव्यात, अन्यथा नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पुढील लोकशाही मार्गाने आंदोलनाचा विचार करण्यात येईल.

निलेश देव, गटनेते, वंचित बहुजन आघाडी तथा नगरसेवक,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!