Friday, June 26, 2026
No menu items!
No menu items!
Homeकेतन अग्रवालचा मृत्यू अन् लोहगड किल्ला ! जेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी...

केतन अग्रवालचा मृत्यू अन् लोहगड किल्ला ! जेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी खजिना ठेवला होता

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : पुण्यातील केतन अग्रवाल निर्घृण हत्या प्रकरणाने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला आहे. बिल्डरपुत्र केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनीच त्याची लोहगडाजवळ हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मानवी संवेदना व संस्कृतीला काळीमा फासणा-या या अमानुष घटनेनं समाजातील नातेसंबंधांवर अविश्वासाचे ढग दाटून आले आहे. आज, हा किल्ला ट्रेकर्ससाठी एक आवडते ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील दृश्ये अधिकच सुंदर होतात.त्यामुळे येथे सतत तरुणाईचा जल्लोष राहत असताना, सिया गोयल हीने आपल्या होणार असलेल्या ‘जीवनसाथी’ केतनच्या हत्येसाठी निवडलेल्या लोहगड किल्ला हा Death Spot तर होणार नाही ना ? असा नकळत, नकारात्मक विचार माझ्यासह लोकांच्या मनात आला असेलच. शेवटी बदलत्या वातावरणाचा परिणाम तर होणारच ना !

या घटनेनंतर महाराष्ट्रात लोहगड किल्ला प्रकाशझोतात आला. राजस्थानमधील लोहगड किल्ल्याबद्दल वाचले आणि ऐकले होते. तेव्हा महाराष्ट्रात असलेला हा लोहगड किल्ला नेमका कसा ? विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा पुण्यात असल्याने याचा मागोवा घेतला असता, छत्रपती शिवाजी महाराजांचा गुप्त खजिना जेथे ठेवण्यात आला होता. ते ठिकाण म्हणजे हा लोहगड किल्ला आहे. हे समजून आले.

महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेतील टेकड्यांवर वसलेला लोहगड किल्ला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अभेद्य आणि अत्यंत सुरक्षित मानला जात होता. शत्रूंना तो जिंकणे खूप कठीण होते. हा किल्ला त्याच्या उंची आणि स्थापत्यकलेसाठी ओळखला जातो.

किल्ला कुठे आणि कसा बांधण्यात आला? लोहगड किल्ला लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणापासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्याजवळ भारतातील प्रसिद्ध भाजा लेणी आहेत. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १०३३ मीटर उंचीवर बांधलेला आहे. या किल्ल्याच्या समोर विसापूर किल्ला असून, तो एका लहान टेकडीने जोडलेला आहे. या दोन्ही किल्ल्यांना जोडणारा एक पूलही आहे. लोहगड किल्ला त्याच्या स्थापत्यकला आणि रचनेसाठी ओळखला जातो. या किल्ल्याला गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महा दरवाजा असे चार मोठे आणि भव्य दरवाजे आहेत. किल्ल्याच्या शेवटी विंचवाच्या नांगीसारखी एक लांब, अरुंद टेकडी दिसते. ती ‘विंचू काटा’ या नावानेही ओळखली जाते. युद्धाच्या वेळी येथून शत्रू सैन्यावर नजर ठेवली जात असे. या किल्ल्यात, वरच्या बाजूला डोंगराच्या उतारावर पावसाचे पाणी साठवण्यासाठी अनेक तलाव कोरलेले आहेत. युद्धकाळात पाण्याच्या टंचाईचा सामना करण्यासाठी हे तलाव बांधण्यात आले होते.

लोहगड किल्ल्याचा इतिहास काय आहे ? या किल्ल्यावर विविध राजवंशांनी राज्य केले आहे. सातवाहन राजवंशाच्या काळात बांधलेल्या या किल्ल्यावर त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट आणि बहामनी सुलतानांनी राज्य केले होते.

छत्रपती शिवाजी लोहगड कधी जिंकला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४८ मध्ये हा किल्ला जिंकला. त्यावेळी, सुरतमधून लुटलेल्या शाही खजिन्याच्या संरक्षणासाठी याचा वापर केला जात होता. तथापि, १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार, शिवाजी महाराजांना हा किल्ला मुघलांच्या हवाली करण्यास भाग पडले. मात्र, पाच वर्षांनंतर, १६७० मध्ये, त्यांनी किल्ल्यावर पुन्हा ताबा मिळवला. नंतर, पेशव्यांनीही येथे राज्य केले. मराठा साम्राज्याचे नाना फडणवीस यांनी येथे आपले निवासस्थान बनवले. त्यांनी येथे अनेक वास्तू बांधल्या. सध्या, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे या किल्ल्याला राष्ट्रीय महत्त्वाचे स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि आजही लोक या किल्ल्याला भेट देतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!