अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : मुंबई परिसरातील विराज प्रोफाईल्स कंपनीतील कथित मानसिक छळाला कंटाळून मूळचा बुलढाणा येथील रहिवासी असलेल्या इंजिनियरने गळफास लावून आत्महत्या केली. नाईलाजाने टोकाचे पाऊल उचलणाऱ्या अभियंत्याने आपल्या सुडाईड नोटमध्ये घटनेची माहिती दिली आहे. या प्रकरणामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून जाधव कुटुंबीयांनी कंपनीच्या मालकासह नऊ जणांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

सुसाईड नोटमध्ये छळाचा तपशील
जातिवाचक शिवीगाळ, धमक्या आणि ब्लॅकमेलिंगमुळे प्रदीप जाधवांनी जीवनयात्रा संपविल्याचा आरोप सुसाईड नोट आणि मृतकच्या पत्नीने बोईसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार निवेदनातून केला आहे.
हीन वागणूक आणि टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप जाधव हे गेल्या सात वर्षांपासून बोईसर येथील विराज प्रोफाईल्स कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदावर कार्यरत होते. मात्र कंपनीचे मालक, सीईओ जितेंद्र प्रताप गर्ग यांच्यासह काही वरिष्ठांकडून त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. जातिवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. १९ जून रोजी प्रदीप जाधव यांना कंपनी मालकाच्या बंगल्यावर बोलावण्यात आले होते. त्या ठिकाणी सीईओसह एकूण नऊ जण उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रदीप जाधव यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या बैठकीनंतर प्रदीप जाधव थेट आपल्या फ्लॅटवर गेले आणि त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली. त्या नोटमध्ये कंपनीतील अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित त्रासाचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर त्यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. या घटनेनंतर बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुसाईड नोट जप्त केली आहे.

पत्नी वंदना प्रदीप जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीएनएसच्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, प्रदीप जाधव यांच्या पत्नी वंदना जाधव आणि मुलगा यश जाधव यांनी आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुराव्यानिशी तक्रार केली आहे.
