Tuesday, June 23, 2026
No menu items!
No menu items!
Homeकेतन अग्रवालचा होणाऱ्या बायकोनेच घेतला जीव ! ...तर हत्या महाबळेश्वरला

केतन अग्रवालचा होणाऱ्या बायकोनेच घेतला जीव ! …तर हत्या महाबळेश्वरला

अकोला दिव्य न्यूज नेटवर्क : लोहगड किल्ल्यावरुन दरीत पडून २४ वर्षीय केतन विशाल अग्रवाल याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. नियोजित वधूने केलेल्या दाव्याप्रमाणे केतन हा सेल्फी काढताना अपघाताने ४०० फूट खोल दरीत पडला नसून होणाऱ्या बायकोनेच त्याला दरीत ढकलल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणात केतनची २० वर्षीय नियोजित वधू सिया प्रविण बसेसर गोयल, तिचा मित्र आणि अन्य साथीदारांनी कट रचल्याचे निष्पन्न झाले. लोणावळा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे लोहगडावरुन ढकलण्याचा प्लॅन फेल गेला, तर महाबळेश्वरला नेऊन त्याची हत्या करण्याचा कटही ठरला होता.

सिया गोयलचा कांगावा
होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेले असताना दरीत कोसळून मृत्यू झालेल्या केतन विशाल अग्रवालच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले. सुरुवातीला अपघात मानला गेलेल्या या घटनेत घातपात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. सेल्फी घेताना जोरदार वारे वाहत असल्याने केतनचा तोल गेला आणि तो खोल दरीत कोसळला, असा कांगावा सियाने पोलिसांसमोर केला होता. परंतु सखोल पोलीस तपासात तिचं पितळ उघडं पडलं.

विशाल अग्रवाल यांची सोशल मीडिया पोस्ट
केतनचे पिता विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट समोर आली आहे. पुण्यातील सिया प्रवीण बसेसर गोयल या धूर्त मुलीने—जिचे आधीपासूनच अनैतिक संबंध होते—आमचा साधा-भोळा मुलगा केतन याच्याशी एक बनावट विवाह रचला. तिच्या चारित्र्याबद्दल व भूतकाळातील वागणुकीबद्दल तिच्या संपूर्ण कुटुंबाला व नातेवाईकांना पूर्ण कल्पना होती; तरीही त्यांनी जाणीवपूर्वक सत्य लपवून ठेवले आणि आमची मोठी फसवणूक केली, असं अग्रवाल यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. आम्हा पीडित पालकांच्या अंतःकरणातून शाप आणि न्यायासाठीचा आक्रोश होत आहे, असंही ते म्हणतात.

मुलाचा जीव घेण्याची काय गरज?
त्या मुलीने यापूर्वीही केतनचा जीव घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. अखेरीस, १८ तारखेला तिने त्याच मित्राच्या मदतीने आमच्या मुलाचा निर्घृणपणे जीव घेतला. समाजाला आमचा एकच प्रश्न आहे: जर त्या मुलीचे वागणे असे होते, तर संबंध सहजपणे तोडता आले असते; मग आमच्या निष्पाप मुलाचा जीव घेण्याची काय गरज होती? या कधीही भरून न येणाऱ्या हानीची भरपाई कोण करणार? असा उद्विग्न सवाल विशाल अग्रवाल यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!