Sunday, May 10, 2026
No menu items!
No menu items!
Homeमहाराष्ट्राच्या 'माय' चा हुंदका ! चक्क १ लाख नापास; चुकीच्या धोरणाचे...

महाराष्ट्राच्या ‘माय’ चा हुंदका ! चक्क १ लाख नापास; चुकीच्या धोरणाचे परिणाम

अकोला दिव्य न्यूज : देशाला दिशा देणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राची अलिकडच्या सर्वच क्षेत्रात अधोगती होत असताना, नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ‘माय’ चं स्थान व अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या मराठी भाषा विषयात तब्बल ९४ हजार विद्यार्थी नापास झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दोन वर्षापूर्वी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात हा आकडा ४० हजार होता, तो आता ९४ हजारांवर गेला आहे. मराठी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, साधनसामग्रीचा अभाव आणि एकूणच गुणवत्तेकडे झालेले दुर्लक्ष यामुळे ही वेळ आली आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

छायाचित्र गुगल सौजन्य

मराठी भाषेला अभिजात दर्जा आणि शाळांमध्ये मराठी सक्तीची केली असतानाही, राजभाषेतील ही घसरण शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवणारी आहे. या वास्तवावर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी शासकीय अनास्था आणि समाजाची बदलती मानसिकता या दोन प्रमुख कारणांकडे लक्ष वेधले आहे.भाषेचे भले करण्याची जबाबदारी केवळ शासनाची आहे, असे मानण्याची समाजाची मानसिकता चुकीची आहे. पालकांनी आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमात घातले तरी घरात मराठी बोलणे, मराठी वृत्तपत्रे आणि पुस्तके वाचण्याची गोडी लावणे आवश्यक आहे. घरातील मराठी वातावरणाच्या अभावामुळे विद्यार्थी आपल्या मातृभाषेतच मागे पडत आहेत. शालेय पुस्तकाबरोबर अवांतर वाचन वाढवणे, हेच उपाय आहेत.

केंद्र सरकारच्या ‘परख’ या मूल्यमापन अहवालात महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर फेकला गेला आहे, ही भूषणावह गोष्ट नाही. केवळ ‘इंग्रजी’ची कास धरताना मराठीकडचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहे.शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून आणि महाराष्ट्रातील ‘वारे गुरुजी’ किंवा ‘रणजितसिंह डिसले’ यांच्यासारख्या प्रयोगशील शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

दहावीच्या निकालात मराठी विषयात इतक्या मोठ्या संख्येने मुलं नापास होणं, हा मुलांचा वैयक्तिक दोष आहे असं मी मानत नाही. मुळात मराठी भाषेकडे अनास्थेने पाहिलं जातं, हा त्याचा परिणाम आहे. तसेच ‘मराठी ही ज्ञानभाषा नाही’, ‘मराठी शिकून स्पर्धेत टिकू शकत नाही’ किंवा नोकऱ्या-रोजगार मिळत नाही’, अशा भ्रमांची एक साखळी जाणीवपूर्वक निर्माण केली गेली आहे. यामुळेच मराठी भाषेकडे दुर्लक्ष होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलं नापास होण्यास केवळ शिक्षक जबाबदार असू शकत नाहीत. ही आपल्या चुकीच्या भाषिक धोरणांची व मराठी शाळा बंद होत चालल्याची फलश्रुती आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!