Today Last Chance ! अकोल्यातील ‘एज्युकेशन एक्स्पो’ने बदलला लाखो पालक-विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन

    0
    5

    अकोला दिव्य • गजानन सोमाणी एडिटर इन चीफ : शिक्षण क्षेत्रात झपाट्याने होणारे अमुलाग्र बदल, महाग होत चाललेले शिक्षण, आभासी जग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चॅटबॉट्समुळे वाढलेली नोकरकपात व सरकारी नोकऱ्यांचा अभाव यामुळे आज विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मोठ्या शहरांतील शिक्षणाचा अवाढव्य खर्च झेपणारा नाही आणि पदवी घेतल्यानंतरही नोकरीची हमी नाही, अशा दुहेरी कात्रीत अकोल्यासारख्या शहरातील सामान्य व मध्यमवर्गीय पालक सापडले आहेत. योग्य माहिती व मार्गदर्शनाच्या अभावामुळे संभ्रमात असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या विदर्भातील पहिल्या भव्य ‘एज्युकेशन एक्स्पो’ला तब्बल दोन दिवस या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहिल्याने या उपक्रमाला न भुतो न भविष्यति, असे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे, याच देही याची डोळा पाहायला मिळाले आहे.

    Maverix multimedia च्या सौजन्याने

    अकोल्यातील शिक्षण क्षेत्रात आपले नाव व स्थान निर्माण केलेले नामवंत तज्ज्ञ आणि व्यवसाय क्षेत्रात स्वतंत्र अस्तित्व घडवलेल्या उच्चविद्याविभूषित व्यक्तींनी एकत्र येत मुर्तिजापूर रोडवरील आरडीजी कॉलेजच्या प्रांगणात अत्यंत आखिव, रेखीव आणि चोख आयोजन केले. संपूर्ण विदर्भात अशा प्रकारचे हे पहिलेच आयोजन असून, केवळ १४ व १५ नोव्हेंबर या दोनच दिवसांत विद्यार्थी आणि पालक मिळून जवळपास लाखाच्या घरात नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली आहे.

    स्टॉल्सवर गर्दी आणि दृष्टिकोनात बदल
    एक्स्पोमधील प्रत्येक स्टॉलवर जाऊन विद्यार्थी आणि पालकांनी विविध अभ्यासक्रम, नवे करिअर पर्याय आणि कौशल्य विकासाबाबत सविस्तर माहिती घेतली. केवळ माहितीच घेतली नाही, तर आपल्या मनातील शंका व प्रश्नांवर तज्ज्ञांशी थेट संवाद साधला. पालकांचे जेमतेम शिक्षण आणि बदलत्या काळाची गरज यातील दरी या संवादातून कमी झाली असून, या भेटीनंतर बहुतांश पालक आणि विद्यार्थ्यांचा करिअरकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले.

    तज्ज्ञांच्या कार्यशाळांतून मोलाचे मार्गदर्शन
    प्रदर्शनासोबतच आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळांमधून नामवंत शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञान, AI च्या युगात टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या संधी यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला. अकोल्यात योग्य मार्गदर्शन केंद्रांची असलेली उणीव या उपक्रमाने भरून काढली आहे.

    आज एक्स्पोचा शेवटचा दिवस
    पश्चिम विदर्भासह संपूर्ण विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरलेल्या या ‘एज्युकेशन एक्स्पो’चा आज, सोमवार १६ नोव्हेंबर रोजी शेवटचा दिवस आहे. अद्याप ज्या विद्यार्थी आणि पालकांनी या प्रदर्शनाला भेट दिली नसेल, त्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची दिशा निश्चित करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

    मुलाच्या करिअरबद्दल माहिती घेण्यासाठी आम्हाला पुणे-नागपूरला जावे लागले असते. इथे एकाच ठिकाणी सगळे मिळाले, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली. फूड व गेम झोनमुळे लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांसाठी हा दिवस माहितीपुर्ण व आनंदाचा ठरला आहे.असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.

    सर्व छायाचित्र आणि रिल्स Maverix multimedia च्या सौजन्याने

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    error: Content is protected !!